Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेळेस इंग्रजांनी ज्याचें ज्याचे नांव नानासाहेब होते त्याला त्याला फांशी दिले, हें या टीकाकारांनीं ध्यानांत घ्यावें. आजच्या युद्धांतहि कशा गोष्टी होत आहेत ते पहावें.
 ज्यूंचा अपराध मोठा होता. ऐन लढायीचे वेळेस त्यांनी द्रोह केला. करार- भंग करून दगाबाजी केली. कोणतें शासन द्यावे ? आजचीहि राष्ट्र अशा आणी- बाणीच्या वेळेस कोणती शिक्षा देतील ? सादनें निकाल दिला तो त्या काळांतील युद्धनीतीप्रमाणे दिला. आणि सादनें निकाल द्यावा, अशी ज्यूंची मागणी होती. ज्यूंनीं जिंकलें असतें तर त्यांनी तेच केलें असतें. ख्रिस्त्यांनी का आरंभी व नंतर थोड्या कत्तली केल्या? ख्रिश्चन नीतिशास्त्रज्ञ तर स्पष्ट सांगत व लिहीत कीं, "दुसऱ्या निर्मळ व निष्पाप जीवांस पापी पापप्रवृत्त करतात. अशा पाप्यांना व दुष्टांना जिवंत ठेवण्यापेक्षां शंभर वेळां नष्ट करणें बरें." परंतु मुस्लिम इतके निर्दय नाहींत. ते एवढेच म्हणतात, त्या वेळेस मुहंमद व त्यांचे अनुयायी यांच्यासमोर जगण्यामरण्याचा प्रश्न होता. बाल्यावस्थेतील अरब राष्ट्र जगतें ना. मुस्लिम धर्म टिकता ना. पुढे पसरता ना; व पुढे जी भव्य संस्कृति फुलली, पुढील अज्ञान काळांत मुस्लीम संस्कृतीनें जी ज्ञानाची मशाल पेटवली, नव-संस्कृतीला सर्वत्र चालना दिली, जीतून पुढील युरोपियन संस्कृति संभवती झाली तें सारें होतें ना."
 ख्रिश्चन नीतिशास्त्रज्ञ लिहितात तेवढें वाटतें बरोबर? ख्रिश्चन करतात तेवढें वाटतें रास्त? इंग्लंडमधील ऑलिव्हर क्रॉमवेलने आयरिश कॅथालिकांची कशी एकजात कत्तल केली! कोणी लांडगा मारला तर त्याला बक्षीस देत त्याप्रमाणें कॅथॉलिकांचं मुंडके आणलें तर त्याला कसें बक्षीस दिले जाई? आणि पुन्हा या सतराव्या शतकांतील गोष्टी. आणि क्रॉमवेल म्हणे अत्यंत धर्मभीरू होता! धर्मात्मेच फक्त त्याच्या सैन्यांत असत! रोज प्रार्थना करणारांनाच तो आपल्या सैन्यांत घेई! तोंडानं प्रार्थना म्हणत ते हल्ला करीत. आणि क्रॉमवेलच्या या क्रूरतेचं समर्थन करतांना तत्त्वज्ञ व इतिहासकार कार्लाईल लिहितो:
 "न्यायी ईश्वराचा मी शिपायी आहे, या भावनेनं जागृत असलेला वीरपुरुष मृत्यूप्रमाणें कठोर बनतो. नशिबाप्रमाणे, भवितव्यतेप्रमाणे, त्या अंतिम न्यायदिनाप्रमाणें कठोर बनतो. आणि देवाच्या शत्रूंवर देवाचा निकाल जणुं देत असतो."

११२ ।