Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लावून ते उभे होते. शेवटीं मूर्तिपूजकांचे ते दहा हजार सैन्य माशा मारून कंटाळूं लागलें. अनेक जातिजमातींचं तें कडबोळे होतें. त्यांच्यांत भांडणेंहि सुरू झालीं. मुस्लिमांनी त्यांच्यांत आणखी भेद पाडले. फाटाफुटी केल्या. ऐक्य नष्ट होऊं लागले. अन्नाचा तुटवडा पडूं लागला. घोडे मरूं लागले. शेवटीं या मैदानी सेनेनेंच खंदकांतून जाऊन चढाई करायची असें ठरविले. हल्ले होऊं लागले. परंतु प्रत्येक हल्ला हाणून पाडण्यांत आला. हे प्रचंड सैन्य पांगू लागले, नष्ट होऊं लागलें. संमिश्र फौजा वाऱ्यावर गेल्या. ईश्वराची मदत आली. प्रचंड वारे उठले. आणि मुसळधार पाऊस आला. तंबू उडून गेले. मैदानी सैन्याची फार दुर्दशा! एक दिवा टिकेना. हिलाल राहीना. अबु सुफियान व त्याचें सैन्य पळाले. या लढायीला खंदकाची लढायी असें म्हणतात.
 मुसलमान आनंदानें शहरांत आले. कांहीं शत्रूंकडील लोक ज्यू बनी कुरेझा यांच्या आश्रयाखाली रहायला गेले. परंतु बनी कुरेझा मदिनेच्या जवळ असणें धोक्याचं होतं. केलेले करार मोडून ते देशद्रोही झाले होते. मदिनेवर अचानक हल्ला करून सर्वांची कत्तल करण्याचे त्यांच्या मनांत होते. परंतु खंदकाच्या लढायीचा निराळाच परिणाम झाला. बनी कुरेझांकडे मुहंमदांनी पुनःपुन्हा जाब मागितला. पुनः पुन्हा त्यांनी उर्मट उत्तर पाठविले. शेवटी त्यांच्या वस्तीस मुसलमानांनी वेढा घातला. ते शरण आले.
 "तुमचा काय निकाल द्यावा, कोणती शिक्षा?" त्यांना विचारण्यांत आलें.
 "आम्हांला काय शिक्षा द्यावयाची तें औसांच्या जमातीचा पुढारी साद यानें ठरवावें. तो योग्य न्याय देईल." ते म्हणाले. हा साद मोठा शूर पुरुष होता. खंदकाच्या युद्धांत तो जखमी झालेला होता. ज्यूंच्या करारभंगानें तो संतापलेला होता. स्वतः मरणाच्या दारीं होता. त्यानें कोणता निकाल दिला ?
 "लढू शकणारे सारे ठार करावे. स्त्रिया व मुलें यानां गुलाम करावें!" सादच्या निर्णयाप्रमाणें शिक्षा दिली गेली.
 या गोष्टीमुळे युरोपियन ख्रिश्चन इतिहासकार मुहंमदांस रक्तार्थ तहानलेला वगैरे विशेषणें देत असतात. इंग्रज सेनापति वेलिंग्टन यानें स्पेनमधून त्या मोहिमेच्या वेळेस शेंकडों लोकांना रस्त्याच्या दुतर्फा कसें फांशी देऊन टाकलें, तें युरोपियन इतिहासकारांनीं ध्यानांत घ्यावें. हिंदुस्थानांतील सत्तावनच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या

इस्लामी संस्कृति । १११