'यतो धर्मस्ततो जयः' असे आपण म्हणत असतो. बद्रच्या लढाईनें तरी हें दाखविले. आपली बाजू सत्याची आहे असें मुहंमदांच्या अनुयानांना नक्की वाटले. या लढायीच्या वेळेस मुहंमदांची आवडती मुलगी रुकैय्या ही मरण पावली. अबिसिनियांतून परत आलेल्या उस्मानजवळ तिचा नुकताच विवाह लागला होता. पैगंबरास अश्रु गाळावयास वेळ नव्हता! कुरेश कैद्यांना त्यांनी मोकळें केले. हे कैदी मक्केला माघारी गेले. ते मुहंमदांची स्तुतीच गाऊं लागले. कुरेश पुढाऱ्यांना हे आवडले नाहीं. अबु सुफियान हा दोनशे लोक बरोबर घेऊन मारू किंवा मरूं अशा निश्चयाने निघाला. विजेसारखा तो आला. आसपासची मदिनेवाल्यांची फळझाडे तोडूं लागला. बाहेर येणारे जाणारे मारूं लागला. मदिनेवाले बेसावध होते. परंतु तेहि सूड घ्यायला बाहेर पडले. तेव्हां अबु सुफियानचे लोक खाण्याच्या पिशव्या टाकून पळून गेले. पिठाच्या थैल्यांची लढाई म्हणून ही प्रसिद्ध आहे. (सबीकांच्या पिशव्यांची लढाई : सबीक हा एक खाण्याचा पदार्थ आहे. अरब लोक हिरवे दाणे भाजतात. मग ते दळतात. त्यांत साखर वा खजूर मिसळून प्रवासांत खातात.) याच लढाईच्या वेळची ती सुंदर सहृदय सत्यकथा आहे. मुहंमद त्यांच्या तळापासून जरा दूर एकटेच एका झाडाखाली झोपले होते. इतक्यांत कसल्या तरी आवाजानें ते जागे झाले. समोर पहातात तो दरथुर उभा. दरथुर हा शत्रुपक्षाचा होता. मोठा वीर होता.
"आतां तुला कोण वांचवील?" तो मुहंमदांस म्हणाला.
"प्रभु" मुहंमद म्हणाले.
वाळवंटांतील तो बेदूइन हे शांत सश्रद्ध उत्तर ऐकून चकित झाला! त्याच्या हातांतील तरवार गळून पडली. ती एकदम मुहंमदांनी उचलली.
"दरथुर आतां तुला रे कोण बांचवील?" मुहंमदांनी विचारिलें.
"अरेरे, कोणी नाहीं वांचवायला!" तो म्हणाला.
"माझ्यापासून दयाळू होण्यास शीक." त्याची तरवार परत करून पैगंबर म्हणाले.
त्या अरब वीराचे हृदय विरघळले. तो पुढे पैगंबरांचा अत्यंत निष्ठावंत अनुयायी झाला.
回 回 回
इस्लामी संस्कृति । १०५