Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मक्केचे मूर्तिपूजक सूडासाठीं जळत होते. मोठ्या युद्धाची त्यांनी पुन्हा तयारी चालविली. त्यांनी इतरहि जातिजमाती बोलावल्या. तीन हजार सेना सिद्ध झाली. तो निर्दय व करारी अबु सुफियान मुख्य नेता झाला. सेना निघाली. मदिनेच्या ईशान्येस तळ देऊन बसली. एक टेंकडी व दरीच काय ती मध्ये होती. येथें तळ देऊन हे सैन्य मदिनेस सतावूं लागलें. शेतें, फळांच्या बागा सारे उध्वस्त करूं लागलें. शेवटीं मुहंमद एक हजार लोकांनिशीं बाहेर पडले. परंतु ऐन वेळीं ज्यूंच्या चिथावणीमुळे अब्दुल्ला इब्न उबयाचे तीनशे लोक फुटले. हे मुनाफिकीन होते. ते अलग झाले. लढायला येत ना. तरी मुहंमद कचरले नाहींत. रात्रीच्या वेळेस ते हळूच बाहेर पडले. ओहोद टेंकडी त्यांनी गांठली. रात्रभर टेंकडीवर राहून सकाळी प्रार्थना करून ते निघाले. अर्धचंद्राकार रचनेनें शत्रुसैन्य पुढें आलें. अबु सुफियान व त्यांच्या देवदेवतांच्या मूर्ति मध्यभागी होत्या. ओहोदची टेंकडी मदिनेपासून तीन मैलांवर होती. मुहंमदांनीं कांहीं तिरंदाजांस उंच जागीं मागे ठेवलें. जागचे हलूं नका सांगितलें. आणि निघाले. कुरेशांचा पहिला हल्ला पिटाळला गेला. हमजाची बहादुरी अपूर्व होती. परंतु तिरंदाज कर्तव्य विसरले. ते एकदम विजयच मिळाला असें समजून लुटालूट करायला निघाले! शत्रुपक्षाकडील खालिद बिन वलीद याच्या लक्षांत ही चूक आली. तो एकदम आपले घोडदळ जमवून मुहंमदांच्या पिछाडीवर तुटून पडला. मुसलमान मध्यें सांपडले. शूर हमजा या लढाईत पडला!
१०६ ।