Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुळसुळाट झाला. मदिनेची सत्त्वपरीक्षा होती. बाहेरून हल्ला आला व आंतहि बंड झाले तर?
 मुहंमदांसमोर कठीण समस्या होती. पैगंबर या नात्यानें त्यांनी सारे अपमान, सर्व निंदा यांना पोटांत घेतलें. परंतु आपल्या लोकांच्या स्वातंत्र्याचे व जीविताचेहि ते आतां रखवालदार होते. ते केवळ आतां धर्मसंस्थापक नव्हते तर राज्याचे प्रमुख होते. आणि वेळहि कठीण होती. सर्वत्र युद्धाचें वातावरण होतें मदिना स्वतःच्या बचावासाठी तयार होत होती. अशा वेळेस लष्करी शिस्त लागते. गुळमुळीत धोरण सर्वनाशी ठरते. अशा वेळेस स्वजनद्रोह अक्षम्य असतो. त्या द्रोहाची उपेक्षा करून चालत नसतें. पैगंबर या नात्यानें मुहंमदांनीं ज्यूंच्या कारवायांकडे दुर्लक्ष केलें असतें, केलेंहि. परंतु मदिनेचे रक्षक व शासक या नात्याने त्यांचें दुसरें कर्तव्य होतें. सहासात जणांना पकडण्यांत आले. त्यांतील कांहींना हद्दपार करण्यांत आले. कांहींनां देहान्त शासन मिळालें! मुहंमद मदिनेची अशी तयारी करीत आहेत तोंच कुरेशांचे सैन्य आल्याची बातमी आली.

回 回 回



इस्लामी संस्कृति । १०१