Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याची तळमळ यांमुळे शेंकडों अनुयायी त्याला मिळतात. आणि शेवटीं त्या सर्वांना यसरिबमध्ये सुरक्षित पाठवीपर्यंत आपण मागें वाघाच्या तोंडी राहतो! आपण सर्वांच्या शेवटी त्या उदार आश्रय देणाऱ्या, स्वागत करणाऱ्या यसरिबला येतो. यसरिबला आल्यावर मुहंमद सर्वांचे पुढारी झाले. जणुं राजे झाले. मानवी हृदयाचे सम्राट बनले. सर्वांचे नेते बनले. ते सल्ला देणारे, तेच स्मृति देणारे, तेच न्यायाधीश, तेच सेनापति! परंतु गर्व तिळभरहि नाहीं. केवळ अगर्वता व नम्रता होऊन रहात. नवीन लोकसत्ता त्यांनी स्थापिली. ते स्वतः त्या सत्तेचे केंद्र होतं. स्वतःच्या हाताने स्वतःचे कपडे शिवणारा, कधीं कधीं उपाशी राहणारा हा धर्मसंस्थापक. पृथ्वीवरील सामर्थ्यवान् सम्राटांपेक्षांहि अधिक सामर्थ्यवान तो होता.
 मुहंमदांचं उदात्त उज्ज्वल स्वरूप जगाला दिसले. इतकी वर्षे खटपट व कष्ट करून आज त्यांचे ३०० च फक्त अनुयायी होते! परंतु या ३०० चे ३० कोटी पुढे होणार होते. अपरंपार पीक पुढे यायचें होतें. रोप वाढणार होतें. त्यांची उदात्तता, अढळ मैत्री, सहनशीलता, निस्सीम धैर्य, उत्कटता, तळमळ, उत्साह, स्फूर्ति, प्रेरणा, सत्याची लागणी हे सर्व गुण त्यांच्या बारीकसारीक गोष्टींतून प्रकट होत होते. मुहंमद हे वीर आहेत, महान् वीर आहेत, ही गोष्ट जगाला कळली. येथे लेचेपेचें मन नव्हतें. निश्चयाचा महामेरू अशी ही मूर्ति होती. त्यांच्यावर प्रेम न करणे, शक्यच नव्हतें. त्यांची आज्ञा न पाळणे शक्य होत नसे. हळूहळू यसरिबचे लोक त्यांच्या चरणीं नमले. त्यांच्या भोवती जमले. शरीर व मन मुहंमदांस अर्पिते झाले. आणि ही श्रद्धा साऱ्या अरबस्थानभर पेटत गेली. सारे अरबस्थान पुढे त्यांच्या चरणांशी आले. स्वतःचे कपडे शिवणाऱ्या या मुहंमदांपेक्षां मुकुटधारी सम्राटांना अधिक मान नव्हता. माणसांवर छाप पाडण्याची अद्भुत शक्ति मुहंमदांत होती. आणि ही जी छाप पडे ती कल्याणावह असे, मंगलावह असे.
 मक्केपासून मदिनेला यायला दहा दिवस लागत. मुहंमद आले त्या वेळेस यसरिबभोवती भिंती नव्हत्या. मुहंमदांनी शहराभोवती खंदक करवला. यसरिबच्या आसपास अमलकी लोक रहात असत. रोमन, ग्रीक व बाबिलोनच्या सदैव स्वाऱ्यांमुळे ज्यू उत्तरेकडून खाली आले. त्यांनीं अमलकींचा पराजय करून हिजाजच्या या उत्तर भागांत वस्ती केली. ज्यू आले व नीट तटबंदीच्या

इस्लामी संस्कृति । ९३