Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



यसरिब येथें आल्यापासून मुहंमदांच्या जीवनाची बारीकसारीक माहिती मिळू लागते. येथें आल्यापासूनचे त्यांचं जीवन जगासमोर उघडें आहे. अति महान्, लोकोत्तर विभूति ! आईबापांच्या प्रेमाला बाल्यांतच पारखा झालेला हा मुलगा. त्याचे लहानपण किती केविलवाणें! आणि पुढे कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्थेत ते आले. तें तारुण्यहि किती पवित्र व सत्यमय. पुढे जरा प्रौढपणा आल्यावर पहा. किती निष्ठा व प्रखरता. दीनदरिद्रांसाठी, अनाथां- दुबळ्यांसाठी किती कळवळा. दुसऱ्यांचे दुःख ऐकायला, दुसऱ्यांची हाक ऐकायला कान सदा टवकारलेले. प्राणिमात्रांकडे सहानुभूतीने पाहणारे त्यांचं हृदय. प्रेमाने पाहणारे त्यांचे मोठे डोळे. अत्यन्त विनम्र व विशुद्ध असें जीवन. मुहंमद जाऊं लागले म्हणजे बोट करून लोक म्हणत, "तो पहा अल अमीन चालला!" सच्चा, न्यायप्रिय, विश्वासू पुरुष. प्रामाणिक विश्वासु मित्र, प्रेमळ निष्ठावंत, पति. जीवनमरणाचीं गूढें उलगडूं पाहणारा ऋषि. मानवी कर्तव्यांचा विचार करणारा हा तत्त्वज्ञ. मानवी जीवनाचे गन्तव्य काय, याचे चिंतन करणारा योगी. असा हा महापुरुष नवराष्ट्र- निर्मितीच्या उद्योगास आरंभ करतो. साऱ्या जगाला सुधारू बघतो. पदोपदीं विघ्नें. परंतु हा महावीर डगमगत नाहीं. पदोपदीं पराजय. परंतु निराशा त्याला शिवत नाहीं. अदम्य आत्म्याने सदैव पुढे जाण्यासाठी धडपड करतो, जीवनाचे कार्य पुरे करण्यासाठी धडपडतो. शेवटीं त्याचं पावित्र्य व त्याची उदात्तता, ईश्वराच्या दयेवरची त्याची जिवंत श्रद्धा व
९२ ।