Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जागीं राहिले! तेथें राहून आसपासच्या अरबांवर ते प्रभुत्व स्थापित यसरिब शहरांतहि ज्यूंच्या दोन शाखा होत्या. पुढे या यसरिब शहरांत औस व खजरज या दोन अरब शाखा आल्या. त्यांनी ज्यूंचे वर्चस्व कमी करून त्यांना एकप्रकारे मांडलिक केलें. परंतु आपसांत लढाया, मारामाऱ्या सदैव चालतच. मुहंमदांनी मक्केत आपले जीवनकार्य जाहीर केलें, त्या सुमारासच यसरिबधील ही भांडणे तात्पुरती तरी मिटली होती.
 मुहंमद आल्यावर औस व खजरज या दोन्ही अरब जमाती भांडणे मिटवून एक होऊन नवधर्म स्वीकारून मुहंमदांच्या झेंड्याखाली उभ्या राहिल्या. या लोकांना अनसार म्हणजे साहाय्यक असें नांव मिळाले. इस्लामच्या कठीण प्रसंगीं साहाय्य केलें म्हणून अनसार, अनसारी. मक्केमधून घरदार सोडून जे मुहंमदांबरोबर यसरिबला आले त्यांना मुहाजिरीन म्हणजे निर्वासित लोक, परागंदा लोक असें नांव पडले. अनसार व मुहाजिरीन यांच्यांत खरा बंधुभाव उत्पन्न व्हावा म्हणून मुहंमदांनी नवीन परंपरा पाडल्या, नवीन संबंध निर्मिले. यसरिब शहराचें नांवहि त्यानीं बदललं. 'मेदीनत-उन्-नबी' म्हणजे पैगंबराचे शहर असें नांव दिलें. नबी म्हणजे पैगंबर. याचाच संक्षेप होऊन मदिना नांव झालें. आणि स्वतःच्या हातानी पहिली मशीद त्यांनी बांधिली. ते दगड आणीत होते. घाम गळत होता. ही पहिली मशीद जेथे बांधली गेली ती जागा दोघा भावांची होती. त्यांनी ती जागा बक्षीस दिली. परंतु हे दोघे भाऊ पोरके होते. मुहंमदांनी त्यांना जमिनीची किंमत दिली. इस्लामची ही पहिली मशीद! ती अत्यंत साधी होती. माती-विटांच्या भिंती. ताडाच्या पानांचे छप्पर. ज्यांना स्वतःचे घरदार नसेल अशांना रहाण्यासाठी मशिदीचा कांहीं भाग राखून ठेवलेला होता. येथे सारे अत्यंत साधेपणाने चाले. मुहंमद उभे राहून प्रार्थना करीत, उपदेश करीत. एका ताडाच्या झाडाला टेकून ते उभे रहात आणि हृदय उचंबळवणारें प्रवचन देत. श्रोते सर्वेन्द्रियांनी जणूं पीत. मुहंमद एके दिवशीं म्हणाले, "जो देवाच्या प्राण्यांवर प्रेम करणार नाहीं, स्वतःच्या मुलां-बाळांवर प्रेम करणार नाहीं, त्याच्यावर देवहि प्रेम करणार नाहीं. जो जो मुसलमान उघड्या माणसाला पांघुरवील, अवस्त्राला वस्त्र देईल, त्याला प्रभु स्वर्गात दिव्यांबरानी नटवील." एकदां भूतदयेविषयीं प्रवचन चाललें होतें आणि मुहंमद म्हणाले, "ईश्वरानें पृथ्वी निर्माण केली त्या वेळेस ती नवीन
९४ ।