पान:इत्ता..इत्ता..पाणी.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लाल ओघळ येत. दुरून पाहणाराला वाटे जणू जखमच वाहतेय!!
 अशा कुरणवाडीत तालेवाराची लेक कशी येणार?जिथे पोरी भरपूर,तिथलीच लेक इथे सून होऊन येई. पाऊसकाळ संपता संपता कुरणवाडी रिकामी होई. दोनतीन घरे यातून वगळायची. एक देशमुखाचे न दुसरे जगू मारवाड्याचे आणि तिसरे व्यतिपात, सणवार सांगत, दहा गावांत फिरणाऱ्या शंभूदेवाचे. बाकी घरातली तरुण माणसे गाव सोडून जात. रोजगारासाठी मुंबई-पुणे गाठीत. बरेच जण जोडीने साखर कारखाने गाठीत. काहीजण गवंडी कामासाठी मुंबईस जात. गावात उरत लेकुरवाळ्या बाया, पोरीसोरी आणि बुढे मायबाप.
 तर अशी ही कुरणवाडी. बायांना छळणारी. पाणी आणताना कावलेली सून, दर साली विहिरीत पडे. पाय घसरून. मग सारीजण बोलत. 'आसरांचा फेरा थोरातांच्या विहिरीकडे आला. भुकेजून आसरांनीच सुनेला उचलले. पण खरी कहाणी साठी गाठलेली भागूमाय सांगत असे "आसरा कुठून येणार गं? भरली घागर डोईवर घेऊन डोंगर चढायचा. साधी बाब नाही. माणसांना सांगा चार खेपा आणायला! मंग कळंल जीवाची परेशानी. बिचारी तरणी सून. कोणाजवळ मन मोकळं करणार? हिरीचा