Jump to content

पान:इत्ता..इत्ता..पाणी.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठाव घेते नि दुख संपवते. दुसरं काय आहे हातात."
 एखादी सून विहिरीत पडून गेली की गावभर दुखणाई पसरे. आयाबाया आपसात बोलत. तुळतुळ करीत. आज हिची पाळी. उद्या तिची, तर परवा माझीही. उपाय सुचत नसे.

 आज हिरा वाचली. सखुमायची सविता होती म्हणून. सविताचे कौतुक करायचे ठरले. सायंकाळची जेवणी खाणी उरकली. गावची हरेक बाई, मुलगी हिराबाईच्या अंगणात गोळा झाली. हिराची सासू मंजुळा. तिने भगुणं भरून पाणी चुलीवर ठेवले चहासाठी. सवितासाठी चोळीचा खण पेटीतून काढून ठेवला. हे डोकं हिराचं. ती पण पाचवी पास आहे. गुणी पोर आहे. पण इथे चव कुणाला? सासूला बरीक कवतुक आहे. सविताला खण दिला. पाठीवरून हात फिरवला. सविता आनंदली. बोलू लागली