Jump to content

पान:इत्ता..इत्ता..पाणी.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मन कातरलेले. डोळे ओलावलेले.
 "ताई, आता नका बोलून लाजवू. आमी पाण्याची सोय करतो. पण तुमचीही मदत हवी. एकीची नाही साऱ्या गावाची. गावातल्या बहिणींची. देणार मग?....."
 बी. डी. ओ. भाऊंनी विचारले.
 "हो. . हो. . देऊ की." जोरात आवाज उठला.
 "यंदा झाडं लावायची" बी. डी. ओ. भाऊ बोलले.
 "पन झाडाले पानी कोन आननार? ते कुठून आनायचं?" सखूमावशींनी विचारले.
 "ऐका, तेच तर सांगतोय. तुमचं गाव डोंगरातलं. जिथे तिथे चढ नि उतार. पाऊस पडतो. पाणी सरक़न् वाहून जातं. ते यंदापासून जागोजाग आडवूया." बी. डी. ओ. भाऊं बोलले. "आत्ता बया! पानी कसं आडवावं माय? ते तर पळनारच की!” बुढी भागुमाय बोलली.
 "हे. बघा आजी. खड्डा खणला की पाणी साठतंय की नाही? मग डोंगर उतारावर चौकोनी खड्डे खणायचे. खोल आणि रुंद. ओळींनी खणायचे. उतारापाशी दगडगोटे रचून पाणी अडवायचे. काय?" भाऊंनी विचारले.
 तशी हिरा बोलू लागली,
 "होय भाऊ. मी दोन सालाखाली आंबाजोगाईला गेले होते. माजा मामा साकुडचा. ते गाव बी डोंगरातच

१२