पान:इत्ता..इत्ता..पाणी.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जवानीतच वाकून गेलोत. पानी नाही ते घर कसं? घराला घरपन देनारी बाईच. मग उचला घागर नि पळा हिरीला. धा-बारा मानसांचं घर. पंचवीसं घागर पानी लागतंच. आंगुळीपांगुळी, कपडे, भांडी, धुणं, जनावराला पानी हवं. ती तर मुकी लेकरंच! शिवाय सारवण,सणवार."
 "होय! होय! सगळं खरंय ताई. मुंबईचा पानीवाला साहेब येऊन गेला. सारा डोंगर पालथा घालून गेला. पण जमिनीच्या पोटातच पानी नाय, तेच कमी झालंया. काय भागूमाय?". सभापती बोलले.
 "होय रे पोरा. जवा लगीन होऊन सासरी आले, तवा कशी होती कुरणवाडी? जणू हिरवा शालू पांगुरलेली नवी नवरीच. झाडांची दाटीवाटी, आठ सालांची आसंल मी. थोडं थोडं आठवतंया. गावात घरं होती पंधरा, नायतर वीस. शहरंगावं वाढू लागली. अहमदपूर, परळी, आणखी कितीतरी. कुरणवाडीतून लाकडांची तोड सुरू झाली. भरभरून बैलगाड्या शहरदिशेने रवाना होत. दुष्काळाचा फेरा दर दोन सालांनी येई. पाहता पाहता कुरणवाडी बोडकी झाली. झाडं इकून लोकांनी पैका केला. झाडं लावाचा मातुर कोणाला सुचलं नाही. गडीमानसांचं शानपन हे असं. आमी तर काय बायाच! डोकं चालवाया शिकवलंच नाय."भागूमायला बोलता बोलता दम लागला.
 थोडावेळ सगळे कसे शांत शांत. कोणीच बोलेना.

११