पान:इतिहास-विहार.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
केळकरांचे लेख

होते. इ. स. १७६० सालीं उदगीरच्या लढाईत मोगलांचा पूर्ण पराजय करून त्यांजकडून नानासाहेबांनी ६२ लक्ष रुपये उत्पन्नाचा मुलुख घेतला. पण नंतर लौकरच नानासाहेब मरण पावले, त्यामुळे व पानपतच्या लढाईत भाऊसाहेब व दुसरे अनेक प्रख्यात सरदार व दीड दोन लक्ष फौज जमीन- दोस्त झाली, अशी संधि पाहून मोगलानें गेलेला मुलुख परत मिळविण्या- साठीं पुण्यावर प्रचंड सेनेसह स्वारी केली. परंतु अशा विपत्काळींहि मोगलांशी मराठ्यांनी अशा निकरानें व शौर्यानें युद्धे केली की, मोगलांस तह करून घेऊन परत जाणें भाग पडलें, पण रघुनाथराव दादासाहेब व सखारामबापू यांनी मोगलांस फितूर होऊंन तहाचे वेळी त्यांचा सत्तावीस लक्षांचा मुलुख त्यांस परत दिला. हे त्यांचें करणें मराठे सरदारांस अर्थातच पसंत पडले नाही, त्यामुळे भांडणे झालीं. दादासाहेब व सखारामबापू हे कसून राजीनामे देऊन घरी बसले. तेव्हां पेशव्याच्या मातोश्री गोपिकाबाई- साहेब यांनी बाबुराव फडणीस व त्रिंबकराव पेठे यांस कारभार सांगितला व फौजेचें काम गोपाळराव पटवर्धन यांजकडे दिलें. दादासाहेबांनी सखाराम- बापूच्या चिथावणीनें बंड केलें व मोगलाच्या फौजेस मदतीस घेऊन घोडनदी व अळेगांव येथील लढायांत पेशव्यांच्या फौजेचा मोड केला. पारडें फिरतांच नवीन कारभारी कामावरून दूर झाले व कैदेतहि पडले, व खुद्द माधवराव पेशवे यांस नजरकैदेत राहणं प्राप्त झाले. दादासाहेब व सखारामबापू यांचा मुख्य राग पटवर्धन सरदारांवर असावा असे दिसतें. त्यांचे पारिपत्य करून त्यांचेकडे असलेली जहागीर व मिरजेचा किल्ला परत घ्यावा म्हणून दादासाहेबांनी पन्नास हजार फौजेनिश स्वारी केली. या फौजेनें मिरजेस वेढा घातला व एका टोळीने गोपाळरावावर छापा घालून त्याची फौज लुटून फस्त केली. मिरजेत गोपाळरावाचे वडील गोविंद हरि होते त्यांनीं सव्वा महिनापर्यंत मिरज मोठ्या निकरानें झुंजविली. शेवटीं शरण येऊन मिरजेचा किल्ला दादासाहेबांचे हवालीं त्यांस करावा लागला, गोपाळराव छाप्यांतून निसटून मोंगलाकडे गेले. मोगलानें आदर- सत्कार करून त्यांस ठेवून घेतलें. हे पाहून दादासाहेबांनीं पदच्युत केलेले भवानराव प्रतिनिधि, त्याचा मुतालीक गमाजी, बाबुराव फडणीस व दुसरे कित्येक सरदार व जानोजी भोंसले हेही मोगलास जाऊन मिळाले.