पान:इतिहास-विहार.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शनिवारवाड्याचा जीर्णोद्धार

उंदीर-घुशी या उकराउकरीने चांगल्या इमारती उध्वस्त करितात व या अलौकिक उंदीर-घुशी उध्वस्त इमारती फिरून चांगल्या नीटनेटक्या करितात. उंदीर-घुशींची ती एक जात स्वार्थी व ही दुसरी परोपकारी इतकाच फरक !

 मुंबईसरकारच्या प्राचीन वस्तुसंशोधक खात्यानें पुणे येथील शनिवार- वाड्यांत हल्लीं 'उकराडकरी'चें काम चालविलें आहे, त्यावरून वरील सर्व सिद्धांतांचें समर्थन करितां येण्यासारखे आहे. बरोबर दोन वर्षापूर्वी या वाड्याच्या तटांच्या आंत काय दिसत होतें व तेथेंच आज काय दिसत आहे. याची तुलना करून पाहणारास किती तरी आश्चर्य वाटेल. एका अर्थानें या ठिकाणीं ज्या वस्तूंचें संशोधन घडलें त्या फार प्राचीन किंवा पुरातन आहेत असें नाहीं. कारण सन १७२१ साली, म्हणजे आज बरोबर दोनशे वर्षांपूर्वी, या जागेवर मोठ्या खर्चानें उकरून उद्धार करण्यासारखें वैभव कांहींच नव्हतें. तेथें त्या वेळी फक्त मुळामुठा नदीत जाळे टाकून मासे मारणान्या कोळ्यांचीं कांहीं खोपटें होती. त्याचप्रमाणे सन १९१९ च्या ऑगस्ट महिन्यांत या वाड्यांकडे डोकावून पाहणाराला इतकेंच दिसले असतें कीं, ईशान्यकोपयाला कोणीं कांहीं फुलझाडें लावली आहेत, उत्तरेस तटाला लागून मातीच्या ढिगावर पोलिसांकरितां खोपटें बांधलेलों आहेत, दक्षिणेला जुन्या पायावर न्यायकोर्टाची एक इमारत आहे, व आसपास उंचसखल जागेत गवत व रानवेली यांचीं झुडपें बनून पाय ठेवण्याला भीति वाटेल असें जंगल माजलेलें आहे. वास्तुदेवतेला श्रीमंती चा कंटाळा आल्यावर कंगाल भिकाऱ्याचा वेश घेण्यांत फार हौस वादते असे म्हणतात तसा प्रकार या वाड्यांत झाला होता. आणि विधीची विचित्रलीला अशी कीं, ज्या जागेवर पूर्वी पेशव्यांचा मुख्य चौक व दिवाण- खाना होता त्याच जागेवर मुन्सफकोर्टाचे शौचकूप उभारण्यांत आलेले होते ! पण दैवानें किंवा वैराग्यानें आणलेल्या विद्रूपपणाचा असा कळस झाला म्हणजेच जीर्णोद्धाराचें नवें युग सुरू होतं.

 शनिवारवाड्याची जागा कोर्टाकरितां दिली त्यापूर्वी ती डेक्कन एज्यु- केशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलला देण्याचें सरकारने ठरविलें होतं. पण कित्येक राजकारणी इंग्रजांना कुशंका येऊन त्यांनी ती देणगी माघारी