पान:इतिहास-विहार.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
केळकरांचे लेख

विभूतितत्त्व हें केवळ अंगीकृत कार्याच्या यशः सिद्धीवरच अवलंबून नसतें. निदान हैं तरी खरें कीं, चारित्र्याची यशः सिद्धि हीच खरी सिद्धि, अंगी- कृत कार्य साधो वा न साधो, केवळ कार्याची सिद्धि ही खरी सिद्धि नव्हे. भारत व रामायण यांतील नायकांचा विजय झाला आहे खरा; पण ग्रीक आद्य कवि होमर याच्या इलियड नामक महाकाव्यांतील खरा नायक हेक्टर हाच असून तो युद्धांत पडला व मारला गेला; किंबहुना त्याच्या शत्रूनें प्रेतास आपल्या रथाला बांधून फरफटत फिरविलें व त्याची दुर्दशा केली. तथापि, ईलियडला हेक्टरचा पोवाडा म्हटले तरी त्यांत फारशी चूक होणार नाहीं.

 पोवाड्यासंबंधानें दुसरीहि एक गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे; ती ही क़ों, त्यांतील नायक यशस्वी झालेला असलाच पाहिजे हा निर्बंध जसा नाहीं, तसेंच तो तत्कालीन सनदशीर रीतीनें भांडणाराच असला पाहिजे असेंहि नाहीं. सनदशीर व बिनसनदशीर हा भेद वास्तविक फार महत्त्वाचा आहे; व कोणत्याहि विनसनदशीरवाल्यास त्याचे उदाहरण राजसंस्थेच्या यद्यतत्त्वास विघातक व सद्यस्तापदायक असल्यामुळे - शिक्षा होणें व त्याच्या कृत्यास राजशक्तीनें आळा घालण्याचा प्रयत्न होणें हें योग्यच आहे; आणि ज्या वेळच्या त्या वेळीं व्हावयाचें तसें होतच असतें. पण कालांतरानें सनदशीर व बिनसनदशीर हा सूक्ष्म औपचारिक भेद विसरला जाऊन ज्या त्या कर्त्या पुरुषांच्या अंगच्या अलौकिक गुणांची तेवढी आठवण जनतेस राहते. कायदेशीर व बेकायदेशीर हे मानवी कृत्याचे गुणधर्म अनित्य व अशाश्वत आहेत. पण त्या कृत्यांमधील शौर्य- धैर्यादि उच्च मानवी गुण हैं. मात्र नित्य व शाश्वत असल्यामुळे कालांतरानें तेच टिकतात. इंग्रजी. बायांत राजे. लोकांप्रमाणें राजबहिष्कृत दरोडेखोरांचेहि पोवाडे झाले आहेत; यावरून ही गोष्ट उघड सिद्ध होते. रॉबिनहूड हा इंग्रजी भाषेतील पोवाड्यांचा एक अत्यंत लोकप्रिय नायक आहे; पण तो फांशीची शिक्षा झालेला दरोडेखोर होता ! त्याच्या अंगीं माणुसकीचे उंची गुण सर्व कांहीं होते. सुष्टांचा कैवारी, दुष्टांचा शत्रु, न्यायी, शूर, उदार, प्रणयी- अशा गुणांनी युक्त असलेल्या रॉबिनहूडचें व त्याच्या वेळच्या अधि काऱ्यांचे भांडण होतें; तो त्यांच्या हातीं लागता तर त्यांनी त्यास फांसा-