पान:इतिहास-विहार.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साऱ्या धर्मक्षेत्रांचे एकच नशीब

४७

त्याहि वेळी घडलें नाहीं. माधवरावांच्या मनांत निराशेचे शल्य मरेपर्यत' राहिलें होतें ! तें जाण्याची आशा नाहींशी झाल्यावर थेऊर मुक्काम नक कलमांची याद त्यांचे हेतु पुरे करण्याकरितां झाली, त्यांत श्रीक्षेत्र काशी- प्रयागाविषयीं दोन तीन कलमें आहेत. एका कलमाचे शब्द खालीलप्रमाणे आहेतः --- " श्रीकाशी व प्रयाग हीं दोनही स्थळे सरकारांत यावी असा : तीर्थरूपांचा बेत होता त्यास प्रस्तुत करावयाजोगे दिवस आहेत. दहावीस लक्षांची जहागीर मोबदला पडली तरी दोनही स्थळें हस्तगत करावी. प्रयत्न करावा." या कलमावर मुख्य मुत्सद्द्यांनी 'सदरहू लिहिले अन्वयें शपथपूर्वक करूं' असे लिहून दिलें. पुढें लवकरच सालबाईचे तहाचे वेळी हा योग आला. दरम्यान श्रीक्षेत्र इंग्रजांचे पुरें कबजांत आले होते, पण अर्थात् वै जिंकून घेणें अशक्य म्हणून मोबदल्याने मिळविण्याची खटपट करण्याकरितां या तहाच्या सतरा कलमी यादीत 'श्रीकाशी व प्रयाग दोनही तीर्थाच्या जागा आहेत त्या आम्हांकडे द्याव्या', असें एक कलम घातले गेलें होतें. पण तहनामा करवून देण्याची भिस्त महादजीवर होती, व महादजींनी या कामी शैथिल्य दाखविलें म्हणा, अगर इंग्रजांनीं त्यांची विनंति मान्य न केली म्हणा, हें विशिष्ट कलम उगवितां आलें नाही एवढे खरें. महादजी व नाना फडणीस हे वारल्यानंतर या कामी लक्ष घालण्यासारखा मातबर मनुष्य कोणी राहिला नाहीं. बाजीराव एका अर्थानें धार्मिक म्हणजे स्नान- संध्याशील होता, पण ज्यानें हाती असलेले सर्व राज्य गमाविले तो धर्मः क्षेत्राची सुटका कोठून करणार?