पान:इतिहास-विहार.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साऱ्या धर्मक्षेत्रांचे एकच नशीब
-१-

महायुद्धांतून चांगल्या गोष्टी कोणत्या निघाल्या व वाईट कोणत्या निघाल्या यांची बेरीज-वजाबाकी करून शिल्लक काय उरतें हें अजमावण्याचे काम फारच कठीण आहे. तथापि कांहीं चांगल्या गोष्टी घडणार, असें उघड दिसतें. त्यांपैकीच एक ही कीं, ज्यू लोकांना हजारों वर्षानंतर पाय टेकण्याला स्वतःची म्हणून भूमि मिळणार. ज्यू किंवा यहुदी लोक फार जुनेपुराणे आहेत. ज्या ख्रिस्ती धर्माला सुरू होऊन भज सुमारें दोन हजार वर्षे होत आली, त्याचा प्रारंभ व ज्यूहश राष्ट्राचा म्हास या गोष्टी समकालीन होत, येवढे सांगितलें म्हणजे ज्यू लोकांच्या जुनाटपणाची कल्पना येईल. ख्रिस्ती धर्मानें यहुदी धर्माला मागे टाकलें, तर त्याच्या पूर्वी यहुदी लोकांचेंहि राज्य नाश पावून त्याची वाताहात होऊन परक्यांच्या अमला- खालीं जावें लागलें होतें. ख्रिस्ती धर्म पुढे आल्यापासून तर काय बोला- वयासच नको. यहुद्यांनी प्रत्येक खिस्ती राष्ट्रांत आळीपाळीने आसरा घेऊन पाहावें, पण प्रत्येक राष्ट्रानें त्यांना महारोगग्रस्ताप्रमाणें दूर लोटावे असेच घडत आले आहे. भारतीय वीर अश्वत्थामा, कपाळांतला मणि काढून घेतला गेल्यामुळे, जखम भरायला तेल मागण्याकरितां अमर होऊन जग- भर हिंडत असतो असें म्हणतात; तीच स्थिति प्रत्यक्ष ज्यूइश लोकांची आहे. वाँडरिंग ज्यू हें नांव त्यांना त्यांच्या जगभर परिभ्रमणामुळेच मिळालें आहे. म्हटलं तर जगांतील सर्व देशांत त्यांची वस्ती आहे; पण स्वतःचा म्हणावयाला त्यांचा असा देश. एकहि नाहीं. तथापि धन्य त्या ज्यूइश लोकांची कीं, सर्व जगभर उपरी म्हणून राहणाऱ्या व सर्वत्र निंदा व हेटाळणी पावलेल्या या लोकांनीं आपल्या जन्मभूमीची आठवण टाकली नाहीं; एवढेच नव्हे तर कधी काळीं जिहोवा देवाच्या कृपेनें पॅलेस्टाईन प्रांतांत फिरून आपली सत्तेची म्हणून लहानशी भूमि होईल व राष्ट्र या नात्यानें आपण फिरून तेथे नांदूं' अशी आशा त्यांनीं निरंतर उराशी बाळगली.. या दृढविश्वासाचे फळ म्हणूनच की काय त्यांना या महायुद्धांत ही संधिः