पान:इतिहास-विहार.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक आठवणी व सद्यःस्थिति

वाल रा.शि. म. परांजपे यांचें तात्त्विक व्याख्यान व रा० अळेकर यांचे व्यावहारिक 'व्याख्यान या दोघाचे एकत्र मनन केल्यास विषयास पूर्तता येते परांजपे यांनी मनाच्या शक्तीचें उत्कृष्ट वर्णन केलेले आहे. मनाच्या शक्ती-बद्दलचा सिद्धांत आपल्या जुन्या व पाश्चात्य वायांतहि प्रतिपादन केलेला आहे. बायरनचें 'प्रिझनर ऑफ शिलॉन' हें काव्य वाचल्यास, शरीर बंदि-वान होऊन पडलें तरी मन स्वातंत्र्याच्या वातावरणांत कसे नांदूं शकतें हैं कळून येईल. पण मनाच्या मदतीनें शुद्ध हवेत जाऊन कल्पनासुख भोग- ण्याचा आनंद नुसत्या विपन्नांनाच नव्हे तर संपन्नांनाहि आवडतो. संपन्न झाला तरी त्याची सुस्थिति सर्वोगांनी पूर्णतेस गेलेली असते असे नाहीं. श्रीमंत लोकांना ईश्वरानें सुस्थितीत उत्पन्न केलें म्हणून त्यांच्यामध्यें राष्ट्रीय हितबुद्धि नसते असें म्हणणे हा अन्याय होईल. इटालीचा अभ्युदय होण्यास दरिद्री ग्यारिबाल्डीप्रमाणे संस्थानिक व्हिक्टर इमान्युएल याचीहि राष्ट्रीय हितबुद्धि उपयोगी पडली, किंबहुना त्या वेळी राष्ट्रीय पुढारी होण्यास असा संपन्न व स्वार्थत्यागी संस्थानिक न मिळता तर इटालीला स्वातंत्र्य मिळ- तेंचना ! राष्ट्रांच्या दृष्टीने पाहतांहि, आहे ती सुस्थिति गमावण्यास ती तयार नसली तरी जुन्या ऐतिहासिक आठवणी राष्ट्रे त्याज्य मानीत नाहीत, अमेरिका च इंग्लंड यांची आज दोस्ती असली तरी, जुलईची ४ थी तारीख आली म्हणजे, आपण पूर्वी इंग्लंडशी लढून या दिवशीं स्वातंत्र्य मिळविलें या गोष्टीचा उत्सवसमारंभ: अमेरिकन लोक करणारच ! फ्रान्स व इंग्लंड यांची आज दोस्ती आहे तरी इंग्लंडची शत्रू जी जोन ऑफ आर्क तिचा उत्सवसमारंभ फ्रेंच लोक करणारच ! तात्पर्य, ऐतिहासिक आठवणी व वस्तुस्थिति यांचा विरोध बिनतोड आहे असे मानण्याचें कारण नाहीं. म्हणून महाराष्ट्राची आजची जी स्थिति आहे ती असतांहि इतिहासाच्या उच्च पर्वतावर मधूनमधून चढून तेथील ताजी हवा पोटांत घेणें हैं सर्वस्वी युक्तच आहे.


 *श्रीशिवाजी उत्सवांत अध्यक्ष या नात्याने केलेले भाषण. ता. १२ जून १९१७