पान:इतिहास-विहार.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रह
[ भाग अकरावा ]

प्र सिद्ध इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे यांच्या ऐतिहासिक लेखसंग्रहाचा अकरावा भाग नुकताच हातीं आला तो वाचून पाहतां नेहमींप्रमाणेंच मनोरंजक व ऐतिहासिक माहितीनें परिपूर्ण आहे असे दिसून येतें. या सहाशें पृष्ठांच्या खंडांत सन १७९८ चा सप्टेंबर ते सन १८०० .चा फेब्रुवारी, म्हणजे सतरा महिन्यांचे अवधींत लिहिली गेलेली पटवर्धनी दप्तरांतील सुमारे साडेसातशे निवडक पत्रे संग्रहित केलीं गेलीं आहेत. सदरहू काल लक्षांत घेतला असतां तो किती महत्त्वाचा आहे व त्याविषयीं माहिती देणारीं ह्रीं पत्रे किती महत्त्वाची असतील याची कल्पना सामान्य वाचकासहि करतां येईल, त्यांतल्या त्यांत या खंडांत चतुरसिंगाचें वंड, महादजी शिंद्याच्या मरणोत्तर झालेल्या शिंद्याच्या दरबारांतील कलहाचे दुष्परिणाम, करवीरकर महाराज व पटवर्धन यांचा बेबनाव, पट्टणकुडची लढाई, परशुरामभाऊचा मृत्यु, करवीरकरांवरील स्वारी, टिपूवरील अखेरच्या स्वारीची कांहीं हकीकत, धोंडजी वाघाचें वंड, पुणे दरबारांतील इंग्रजांची कारस्थानें, घाटग्याचा अत्याचार वगैरे प्रकरणांसंबंधाची पत्रे विशेष मनोरंजक आहेत. शिवाय नेहमींच्या पद्धतीप्रमाणें ऐतिहासिक-लेखसंग्रह- कर्त्यांनीं प्रत्येक मोठ्या प्रकरणास प्रस्तावना लिहून ऐतिहासिक चर्चेचें सूत्र सुसंगत रीतीनें जोडलेले असून ठिकठिकाणीं खुलाशाकरितां उपयुक्त टिपणेहि दिलेली आहेत.

 समकालीन लोकांना लिहिलेल्या पत्रांतील माहिती इतिहाससंशोधनाला केव्हांहि विशेष ग्राह्य मानिली जाते. त्यांतूनहि पटवर्धनी दप्तरांतील पत्रें सर्वसाधारण रीत्या नीटनेटक पद्धतशीर लिहिलेली आढळतात. त्यांत दिलेली हकीकत सर्व हिंदुस्थानची असली तरी ही प्रायः दक्षिण महाराष्ट्राच्या दृष्टीनें लिहिलेली असते. शिवाय दक्षिण महाराष्ट्रांतील प्रसिद्ध ऐतिहासिक स्त्रीपुरुषांचा सूक्ष्म इतिहास त्यांत वाचावयास मिळतो. यामुळे हे कागदपत्र सहजच मनोरंजक वाटतातच, पण त्यांतूनहि शास्त्रीबोवांची मांडणा,