पान:इतिहास-विहार.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७६
केळकरांचे लेख

दर्जातील मुसलमानांची शिष्टाचारपद्धति किती उच्च कोटीतील होती याची कल्पना येते. मोगल सम्राट् व्यापारवृद्धीकडे विशेष लक्ष देत असंत व त्यामुळेच एकट्या ईस्ट इंडिया कंपनीलाच नव्हे तर दुसन्या हि कित्येक युरोपियन व्यापाऱ्यांना व्यापाराची परवानगी देण्यांत आली होती. मालावर विशेष जकात नसे, तथापि चांदीच्या मालाबद्दल विशेष निर्बंध होते. मोगलांना चिनी मातीच्या भांड्यांचा फार शोक असे व असें सांगतात कीं, अकबर मेला त्या वेळीं फक्त अभ्यांतच पंचवीस लक्ष रुपयांहून अधिक किंमतीचीं नक्षी केलेली भांडी पूर्वेकडील चीन व पश्चिमेकडील व्हेनिस येथून आलेली होती. देशांत शांतता व सुबत्ता - नांदत असल्याशिवाय, अशा प्रकारचा व्यापार अर्थातच चालत नाही. मि० 'व्हिन्सेन्ट स्मिथ आपल्या 'अकबर' या पुस्तकांत लिहितो कीं, अकबराच्या 'वेळी वाहतुकीचे रस्ते फारच सुरक्षित असले पाहिजेत. कारण टेरी वकिलानें · सुरतेहून मध्य हिंदुस्थानापर्यंत ४०० मैलांचा प्रवास अवघ्या ४ युरोपियन - व २० एतद्देशीय अनुचरांसमवेत अगदी सुखरूप केला. अकबराला लिहितां- वाचतां येवो अगर न येवो; परंतु त्यानें जें जें पाहिले व ऐकलें तें तें सर्व * आपलेसे करून टाकले यांत शंका नाहीं. त्यांच्या दरबारांत भोज किंवा विक्रमादित्य यांच्याप्रमाणे उत्कृष्ट विद्वद्रत्नें चमकत होती. त्याला विद्या- भिरुचि इतकी होती कीं, त्यानें उत्कृष्ट ग्रंथ सुंदर अक्षरांत लिहून त्यांत कुशल चित्रकारांच्या हातची अप्रतिम चित्रे घालून तयार केले होते. असे ग्रंथ सुमारे २४००० असून त्यांची किंमत ६५ लक्ष रुपये होती असा कांहीं इंग्रज लेखकांचा अंदाज आहे. अकबरानें इमारती बांधण्याची वेगळीच शैली काढली व तिला एका हिंदु कारागिरांकरवीं दृश्य स्वरूप दिलें. त्यांत हिंदु व मुसलमान दोन्ही शिल्पशास्त्रांचा मधुर संगम झालेला दिसून येतो.

मेकॉलेनें आपल्या 'लॉर्ड क्लाइव्ह' या निबंधांत लिहिलें आहे :-

 " सोळाव्या शतकांत बाबर व अकबर यांनी जें साम्राज्य स्थापिलें तें त्या वेळीं जगांत अत्यंत मोठे व वैभवशाली होतें. कोणत्याहि युरोपियन : राज्यांत एका राजाच्या अमलाखालीं एवढ्या लोकवस्तीचा मुलूख नव्हता व त्यांच्या खजिन्यांत इतकी संपत्तीहि जमा होत नसे. ज्यांनी सेन्ट पिटर पाहिलें आहे, ते लोकहि येथील इमारतींचा मोहकपणा पाहून चकितच