पान:इतिहास-विहार.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानची प्राचीन संस्कृति

१७३

आरामाच्या व उपयोगाच्या कोणत्याहि वस्तु तयार करणें, लिहिणे, वाचणें व गणित वगैरे शिकविण्यासाठीं गांवगन्ना असलेल्या शाळा, अतिथिसत्कार, दानशीलता व सर्वाहून श्रेष्ठ म्हणजे, स्त्रियांबद्दल असलेला आदरयुक्त व्यवहार, हीं जर सुधारणेची लक्षणे असतील तर हिंदु लोक युरोपियन लोकांहून केव्हांहि श्रेष्ठच आहेत. व माझी खात्री आहे कीं, सुधारणा. ही -जर एक व्यापाराची वस्तु झाली तर इंग्लंडला या वस्तु मागविण्यांत फायदाच होईल.

 हिंदु लोकांच्यानंतर, हिंदुस्थानाचा महत्त्वाचा घटक बनलेली जात मुसलमानांची होय ! सुधारणेच्या सर्व बाबतीत हिंदूंच्या प्रमाणेंच यांनीहि उत्तम काम करून दाखविलें आहे. आज मुसलमानांच्या पूर्वेतिहासांत शिरण्याचे आपणांस कारण नाहीं; परंतु सोईसाठी सर्व मुसलमान एक समजूं या ! आरवसंस्कृतीच्या उच्च कल्पना युरोपांत शिरून तेथे त्यांची छाप पडून त्या दृढमूल झाल्या हें कोणासहि नाकबूल करतां येणार नाहीं. ज्या वेळीं रानटी लोकांनीं रोमनसाम्राज्य छिन्नविच्छिन्न करून टाकले व अनेक परस्परविरोधी व हट्टी खिस्तानुयायांच्या कलहानें ख्रिस्तीधर्म हीन स्थितीप्रत जाऊन निस्सत्त्व झाला, त्या वेळीं अरबांनी आपला धर्म .व तलवार यांच्या जोरावर, नवजीवन उत्पन्न केलें. मुसलमानांनी पूर्वेकडे आपल्या विजयी सेना आणण्यापूर्वीच त्यांनीं पश्चिमेकडे विजय संपादन · केला होता. आठव्या शतकांत मुसलमानांनीं भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्या- वरचा सर्व मुलूख काबीज करून, जिब्राल्टरपर्यंत धडक मारली व अवघ्या दहा वर्षातच सर्व स्पेन पादाक्रान्त करून फ्रान्समध्ये पॉइटर्सच्या तटापर्यंत जाऊन धडकले गिबन म्हणतो:- 'या विजयी सेना, जिब्राल्टरपासून लॉयरपर्यंत एक हजार मैल सारख्या पसरल्या होत्या. व हीच त्यांची गति कायम राहिली असती तर, अरबी फौजा, पोलन्ड व स्कॉटलंडमधील हायलन्डवरहि उत्तरल्या असत्या. नाईल किंवा युफ्रेटिजपेक्षां व्हाईननदी दुर्गम नाहीं. तेव्हां कोठेंहि अडथळा आल्याशिवाय अरबी आरमार, थेम्स- नदीच्या मुखांतहि सुखानें उतरलें असतें व कदाचित् आज आक्स्फोर्डच्या विद्यालयांत कुराण पढविलें जाऊन, महमदी धर्माच्या पावित्र्याबद्दल व सत्यतेबद्दल प्रवचनें सुरू झाली असती'.