पान:इतिहास-विहार.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६
केळकरांचे लेख

असे मानण्याचें कारण नाहीं, कारण तोच नियम राजासहि लागू असे. पोलिसकडून चोरीस गेलेला माल परत न आला तर राजा आपल्या खजिन्यांतून चोरीच्या मालाची किंमत भरून देई. हिंदु राजांचे गुप्त हेरहि असत, त्यांस 'राजाचे नेत्र व कर्ण' असें समजलें जाई. पेन्शन व दीन- दुबळ्यांस मदत देण्याची पद्धत असे, व एकनिष्ठपणे राज्याची सेवा करणारास कायमचीं इनामें अगर रोकड देणग्या दिल्या जात.

 वर दर्शविल्याप्रमाणें कायदे करण्याचें काम धर्म व नीति यांत निपुण असे जे लोक असत त्यांचेवर सोपविलें जाई. कायदा सर्वोगपूर्ण असा जरी नसला तरी स्थानिक व सामाजिक चालीरीतीला धरून त्याची बजावणी होई. कायद्याचे उगमस्थान त्यांतूनच आहे असे सर हेन्री मेन हा म्हणतो. कायदे तयार करतांना जे दोष रहात त्यांची भरपाई कायद्याच्या अंमलबजावणी- च्या वेळी होत असे. कायदेहि तपशीलवार रीतीनें लिहिले गेले नसत. तरी न्याय करणारे पंच कायद्यांचा उद्देश पूर्ण ध्यानांत ठेवून फैसल्ला देत व जातींचे पंचहि न्याय देतांना हे तत्त्व विसरत नसत. राजा हा केवळ नाम- धारी न्यायाधीश समजला जाई. कारण न्याय देण्याचे काम पंचामार्फतच होत असे. त्या वेळी न्यायको व न्यायाधीशहि असत; परंतु त्यांचे काम न्याय देण्याचें नसून ते केवळ सल्लागाराचे काम करीत, ज्या वेळी लोक- नियुक्त पंचांच्या आवाक्याबाहेर न्यायनिवाडा अवघड होई, त्या वेळीं न्यायाधीश खटल्यांतील मर्म शोधून काढीत. परंतु निकाल सुनावण्याचे काम मात्र राजा करी. दिवाणी व फौजदारी, असे न्यायखात्याचे दोन वेगळे विभाग केले नसले तरी प्रत्यक्ष व्यवहारांत त्यावांचून विशेष अडतह नसे. प्रत्येक गांवांत एक स्थानिक न्यायालय असून प्रमुख व अनुभवी गृहस्थ यांची पंचायत असे. जातींच्या न्यायपीठांना विस्तृत हक्क होते, तथापि कांहीँ किरकोळ बाबतींखेरीज करून त्यांचे हक्क मर्यादित होते. पंचायती- मार्फत निवाडा होणें हें फार महत्त्वाचे समजले जाई आणि कांहीं विवक्षित पैशांच्या लोकांच्या बाबतींत तरी त्याची बजावणी व्हावी अशी कायदे करणारांची शिफारस असे. अपील व अपिलांवर अपील करणे लोकांस माहीत नव्हतें. अपराध्यांस शिक्षा झटपट होत असल्यामुळें, मुकदमेबाजीचा दुर्गुण लोकांत शिरला नव्हता. तात्पर्य, धार्मिक, व्यावहारिक, रीतिरिवाज