पान:इतिहास-विहार.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
झांशीच्या महाराणी श्री लक्ष्मीबाईसाहेबांची पुण्यतिथि १५१

त्यांच्यांत जे उदात्त गुण दिसून आले त्यांची आठवण म्हणून हा उत्सव करीत आहोत. यांत वर्तमान राजकारण नाहीं व गतकालचेहि राजकारण नाहीं. लास्ट म्यूटिनी हीरो म्हणून एकाद्या फाटक्यातुटक्या शिपायाची नोंद तिकडे करण्यांत येते. त्या वेळी बंडांत सामील असलेला इतकाच त्या हीरोचा अर्थ. बंडाची इतकी आठवण विलायतेत ठेवण्यांत येते. मग भारतीय योदयाच्या तोडीचे पराक्रम ज्या तेजस्वी स्त्रीने केले, तिची आठवण ठेवणें यांत गैर काय आहे ? यांत राजकारण नाहीं. बंड करा असे कोणी सांगत नाहीं. शिवाय आपण जर इतिहास चाळला, तर असे दिसून येईल की, ज्या राजकीय दृष्टीनें बंडाला बंड म्हणतो त्या दृष्टीनें लक्ष्मीबाई - साहेबांनी बंड केलें नव्हतें. इंग्रज सरकारला येथून घालवून द्यावें असा त्यांचा हेतु नव्हता; तर त्यांची सरकारच्या विरुद्ध तक्रार होती. लक्ष्मी- बाईला शेवटी सरकारकडून जी वागणूक मिळाली, त्यामुळे त्या बेफाम झाल्या व शेवटीं नाइलाजानें बंडांत सामील झाल्या. नानासाहेब बंडवाले म्हणून प्रसिद्ध आहेत;पण खरा इतिहास तसा नाहीं. इंग्रजी अधि- काऱ्यांची खुषामत करणारे, त्यांना मेजवान्या देणारे सरदार अशी त्यांची प्रसिद्धि होती. या सगळ्याचा हेतु बाजीरावसाहेब मेल्यावर जें पेन्शन बंद झालें तें परत मिळावें असा स्वार्थी होता. मी आपणाला हा जो नवा वृत्तांत सांगत आहे हा मी ब्रह्मावर्ताला ऐकला आहे. समकालीन लोकांनी लिहिलेला किंवा सांगितलेला तोच खरा इतिहास. मी १९१६ साली ब्रह्मावर्ताला गेलों होतों. बाजीरावांच्या हाताखालीं सरदार असलेले धार- बाडकडचे सुभेदार घराण्यांपैकीं एक वृद्ध गृहस्थ मला भेटले. ते बंडाचे वेळीं हजर होते.त्या गृहस्थांनी अशी हकीकत सांगितली की, इंग्रज या देशांतून जावे म्हणून हैं. बंड केलें नाहीं, तर इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड केलें होतें. नानासाहेबांचे चुलतभाऊ रावसाहेब हे जहाल असून, हिंमतवान् व शूर होते. बेटामध्यें शिकार वगैरे करण्याच्या नादांत ते असत. तोंडांत पट्टा धरून भरलेल्या नदींतून पोहत जाऊन पैलतीर गांठावयाचा व शिकार करावयाची हा त्यांचा व्यवसाय होता. चोहोंकडे बंड झालें, कानपुरास साहेबांची कत्तल झाली. हिंदुमुसलमान हे दोघेहि त्या वेळी बंडांत सामील होते. हिंदु-मुसलमानांची त्या वेळी आटोकाट एकी होती. पण बंड फसलें.