पान:इतिहास-विहार.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
केळकरांचे लेख.

सन १८२७ हे आगीचें साल म्हणून दिलें आहे. पण तें चुकीचें असल्या-मुळं त्याची दुरुस्ती होणें जरूर आहे. गॅझेटियरमध्यें आरसेमहाल आगींतून चचावला असें दिलें आहे, पण तें चूक आहे हेंहि वरील उताऱ्यावरून सिद्ध होतें. उतारा ज्यांतून घेतला ते पत्र शनिवारवाड्यापासून दोनशें पावलांच्या आंत राहणाऱ्या मनुष्यानें आगीनंतर एका आठवडयानेंच लिहिलें आहे.

 पुण्यातील पेशव्यांचे बहुतेक वाडे जळाले. शुक्रवार वाडा १८०३ साली बांधला तो १८२० साली बहुतेक जळाला. तसेच बुधवारचा वाडा व विश्रामबागवाडा १८७८ साली एकाच रात्रीं जळाले. पैकीं बुधवारवाडा - सर्व जळाला, विश्रामबागेचा मागचा कांहीं भाग शिल्लक राहिला.

 शनिवारवाड्याच्या तटाच्या आंतील जागा सुमारें साडेचार-पांच एकर भरेल. पेशवाईअखेर ही बहुतेक जागा इमारती, हौद व बगीचे यांनीं व्यापिली होती. पटांगण असे फार थोडें होतें, आंत घोड्यांची व हत्ती- चीहि पागा होती; परंतु घोडे फेरणें, कवाईत घेणे वगैरे कामें दिल्लीदर- वाजाबाहेरील विस्तीर्ण पटांगणांतच होत असत. वाडा एकंदर सातमजली होता. पण प्रत्येक मजल्याची उंची सरासरी आठनऊ फुटांपेक्षां अधिक होती असे वाटत नाहीं. हल्ली सरकारी खात्याने जेवढ्या भागांतील माती उकरली आहे त्यांत सुमारें पांच चौक, बगीच्याची कांहीं दालने आणि पाण्याचे अनेक हौद व कारंजी हीं उघडकीस आली आहेत. दिल्लीदरवाजांतून आत गेल्यावर नगारखान्याची उंच दगडी भिंत आहे तिच्यावर 'किर्ती- मुखाचा' दगड अद्यापि दिसतो. वाड्यांतील मुख्य इमारतीची मध्यरेषा दाखविणारी ती खूण असावी. इमारत कशा घाटाची असावी याची कल्नना हल्लीं उकरून काढलेले जोतें व आंतील निरनिराळ्या चौकांची जोत यावरून येते. पण उभा वाडा पाहून लिहिलेलें असें सविस्तर वर्णन आढळत नाहीं. सवाई माधवरावांच्या वेळच्या गणपति: महालांतील एका दरबाराचे चित्र छापलेले प्रसिद्ध आहे. त्यावरून थोडीशी कल्पना डोळ्याला येते. बाकीची स्थूल कल्पना नानावाड्यांतील किंवा फडणविसांच्या वाड्यां- -तील छतें, कलमंदानें वगैरेंवरून येण्यासारखी आहे.

 भिंतींचं रंगरोगण किंवा चित्रे यांचे अवशेष कोठें राहिलेले नाहीत.