पान:इतिहास-विहार.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४
केळकरांचे लेख

 हैं. सर्व सुख जरी आज नाहीं तरी तें सुख पूर्वी एके वेळीं आपणांस होतें अशी आठवण करून देण्याचे साधन अद्यापि आपणांजवळ आहे ही तरी कांहीं लहानसहान समाधानाची गोष्ट नव्हे. हें साधन म्हणजे इतिहाससंशोधन होय; आणि त्याच्या योगानें जुन्या काळीं नौका- नयनाची विद्या व व्यवहार आपल्या देशांत उत्कर्षाला पोचलेला होता असे सप्रमाण सिद्ध करणारें एक पुस्तक बंगालच्या नॅशनल कॉलेजचे प्रोफ़ेसर राधाकुमुद मुकरजी यांनी अलीकडे प्रसिद्ध केलेलें असून त्याबद्दल त्यांचें साभार अभिनंदन करणें जरूर आहे. प्रो० मुकरजी यांनीं असें सिद्ध केलें आहे कीं, कर्मीत कमी दोन हजार वर्षेपर्यंत हिंदुस्थान हा देश नौकानयनविद्येचें आणि समुद्रावरील व्यापाराचें एक केंद्रस्थानच होता ! है. प्रमेय सिद्ध करितांना त्यांनीं स्वतःची म्हणून स्वतंत्र अशी कल्पनाशक्ति फारच थोडी चालविली आहे, त्यांत परिश्रमांचेंच काम विशेष आहे. तरी पण तो परिश्रमच इतका व्यापक व पद्धतशीर केलेला आहे कीं, त्यामुळे स्वतंत्र कल्पना चालविण्याचे फारसें कारणच उरत नाहीं. कोणत्याहि इतिहाससंशोधनाची झाली तरी हीच पद्धति असते. तथापि हैं संशोधनाचें एकीकरण एकाच विषयावर झाल्यामुळें प्रो० मुकरजी यांना आपली कल्पना सांगोपांग व मूर्तिमंत अशी वाचकांच्या डोळ्यांपुढे उभी करितां आली आहे ! या संशोधनाच्या अंगभूत त्यांनीं कोणकोणता ग्रंथसंग्रह घेऊन त्याचा कसकसा उपयोग केला आहे हें लक्षांत येण्याकरितां आम्ही त्यांच्या विवेचनसरणीचा थोडक्यांत खालीं उल्लेख करीत आहों.

 कोणत्याहि प्रमेयाला एक प्रत्यक्ष व दुसरा अप्रत्यक्ष असे दोन प्रकारचेः पुरावे असतात, प्रो० मुकरजी यांच्या प्रमेयास दोनहि प्रकारचा पुरावा मिळतो. पैकीं प्रत्यक्ष पुरावा संस्कृत व प्राकृत ग्रंथ यांतून, आणि ग्रंथां- इतकच किंबहुना त्यांहून अधिक प्रमाणभूत अशीं जुनीं शिल्पकलेचीं कामें, चित्रे, तसबिरा, नार्णी, यांतून मिळतो. उदाहरणार्थ, कलकत्त्याच्या संस्कृत.कॉलेजच्या ग्रंथसंग्रहालयांत प्रो० मुकरजी यांना भोजनरपतिकृत 'युक्ति- कल्पतरु' नामक ग्रंथ मिळाला. त्यांत जहाजें कोणत्या लांकडाची बांधावी ?.. ती कशी बांधावी ? तीं लांबरुंद कोणत्या प्रमाणानें असावी ? सामान्य व विशेष प्रकारच्या जहाजांचे उपयोग काय ? जहाजांतील सामानसुमान काय-