पान:इतिहास-विहार.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
केळकरांचे लेख

मि०किंकेड यांनी आपल्या एका ग्रंथांत काठेवाडांतल्या प्रमुख दरोडेखोरा- (Outlaws ) च्या चरित्राचें रसभरित वर्णन केलेलें आहे, हें पुष्कळांस माहीत असेलच. मुलांस रात्रीं दारें लावून घेऊन व अंथरुणावर पडून भुतांच्या गोष्टी ऐकाव्याशा वाटतात; आणि मोठीं मनुष्येहि अद्भुतरसाच्या कामी मुलांसारखींच असतात, असें म्हणण्यास हरकत नाहीं. उमाजीं रामोशाचा आत्मा आपल्या दुष्कृत्यांचा झाडा यमदरबारांत देत असतां, मृत्युलोकीं त्याचे पोवाडे व्हावे व त्याचीं चरित्रे लिहिली जावी, हेंहि वरील चमत्कारिक मनुष्यस्वभावास अनुसरून आहे, एवढेच म्हणतां येईल.

आर्यनौकानयन *

गतकालीन कांहीँ शतकांत हिंदुस्थानांतील आर्यलोकांचे परदेशगमनं बरेचसे संक्षेपांत आल्यामुळे, आम्ही हिंदुस्थानचे लोक पूर्वकाळीं तरी कधीं हिंदुस्थान सोडून बाहेर जात होतों कीं नाहीं याचीच शंका पुष्कळांस येत असल्यास नवल नाहीं, विद्या व शिक्षण हीं ज्यांच्या आधीन त्यांच्या. मनानें, कोणत्याहि कारणानें कां होईना, परदेशगमन निषिद्ध मानलें गेल्यामुळे, परदेशगमनाला प्रायश्चित्त आहे कीं मुळींच नाहीं हाच प्रश्नं काय तो मुख्यतः डोळ्यांपुढे वारंवार येतो; आणि दर्यावर्दीपणाच्या धंद्यांतला महत्त्वाचा भाग, व त्या व्यवहारांतील बहुतेक नफा, आमच्या हातून निघून परकीयांच्या हाती गेलेला आहे अशा आजच्या स्थितीत, पूर्वीच्या काळीं नौकानयनाची कला आम्हांला कितपत अवगत होती, सागर व महासागर यांजवर सफरी करून आम्ही केवढा प्रचंड व्यापार करीत होतों. आणि या व्यापाराच्या अनुषंगानें दूरदूरच्या अशा किती देशांत आमच्या वसाहती झालेल्या होत्या या गोष्टींचे ज्ञान हा अर्थातच केवळ तात्विक इतिहाससंशोधनाचा विषय होऊन राहिला आहे. समुद्राच्या किनाऱ्या किनाऱ्यानें फिरून व्यापारउदीम करणारे छोटे मचवे, पडाव . किंवा महांग्रिन्या यांशिवाय कसलेंहि मोठे भांडे हल्लीं इकडे बांधले जात


केसरी, ता. १३ मे सन १९१३