पान:इतिहास-विहार.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उमाजी नाईकाचें चरित्र

१३९

साकुर्डी व सासवडच्या आसपास पांचपन्नास मैलांतील तंटे त्याजकडे तोड- ण्यास येऊ लागले. त्यास किरकोळ फौजदारी अधिकारहि देण्यांत आले होते. त्यांचा उपयोग सक्तीनें करून उमाजी तंट्याचे निकाल लावी. त्याची जरब अशी असे कीं, त्याच्या निकालावर अपील करण्याची पक्षकारांची छातीच होत नसे ! याच वर्षी त्यानें श्री० छत्रपति प्रतापसिंह महाराजांची. गांठ घेतली व त्यांनीहि त्याचा सत्कार केला.

 इतके सगळें झालें खरें; पण उमाजीचा देहस्वभाव त्यास सोडीना. "आधीं होता वाघ्या, मग झाला पाग्या-त्याचा येळकोट राहिना, मूळ- स्वभाव जाईना ! " ही म्हण उमाजीस अक्षरशः लागू पडण्यासारखी आहे. खरोखरच येळकोटाचा जयघोष करून डोंगरांवरून उड्या घालघालून शिकार करणाऱ्या उमाजीला कायदेकानू, व्यवस्था, न्यायमनसुभा यांचा कंटाळा आला, हें स्वाभाविकच आहे. १८२९ सालापासून फिरून लूटमार व दरोडे यांस त्यानें गुप्तपणें सुरुवात केली. सरकारास त्याबद्दल लवकरच संशय आला पण हे सरकारच्या नोकरानें घातलेले दरोडे; त्याबद्दल उघड बोलावें. कोणी ? अखेर त्यास पुण्यास येऊन स्वस्थ राहण्याबद्दलचा हुकूम झाला. तो त्याने प्रथम मानला; पण उमाजीसारख्या दरोडेखोरास पुण्यास सरकारच्या नजरेखालीं राहून त्याच्या दृष्टीनें मेलेले अन्न खाण्याचें कसचें रुचणार ! त्यानें नोकरीस रामराम ठोकून फिरून डोंगरांचा आश्रय केला. इतकें झाल्यावर सरकारास सक्तीचे उपाय योजावे लागले. त्याला पकडण्याचे काम फौजेची योजना होऊन ती कॅप्टन मॅर्किटॉश यांच्या हातीं देण्यांत आली. उमाजीचे दोनतीनशे लोक व ही फौज यांच्या पाठशिवणीचा खेळ पुढें दोन वर्षे चालून अखेर कित्येक रामोशांच्या विश्वासघातानें उमाजी हा फौजेच्या हातीं सांपडला व सेशन कोर्टात चौकशी होऊन ता. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी त्यास पुणे येथें फांशीं देण्यांत आलें.

 उमाजीनें खून, दरोडे वगैरे जे अनेक भयंकर अत्याचार केले त्याबद्दल त्याला या लोकीं शासन तर झालेच, पण त्याला परलोकहि अधोगतित्व मिळणे योग्य व त्याप्रमाणें त्यास ती मिळालीहि असेल. यांत शंका नाहीं.