पान:इतिहास-विहार.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८
केळकरांचे लेख

जानें याच मुख्य गोष्टी आहेत. दरम्यान नाहीं म्हणावयास 'गष्ठ बसावयास काय घेशील' या तत्वावर इंग्रजांनी ठरविलेला पगार घेऊन तो कांहीं दिवस- पुण्यास नजरकैदेत होता व आपल्या साकुर्डी गांव प्रतिष्ठित पाटील व अधिकारी होऊन सक्तीचा न्यायमनसबा करून एक. प्रकारें राज्य करीत होता.

 उमाजीचा जन्म १७९१ साली झाला. बालपणापासून त्याला हालअपेष्टा व धावपळ यांचें बाळकडूच मिळालेलें होतें. सन १८१८ साली कंपनी सरकारची सत्ता पुण्यास स्थापित झाल्याचे सालीच, उमाजीनें आपल्या कुळास व जातीस अनुरूप असें पहिलें कृत्य केलें व त्यामुळे त्यांस एक वर्षभर कैदेत काढावे लागले; पण त्याच्या धामधुमीस सन १८२१ सालापासून प्रारंभ झाला. १८२३ साली त्याने भांबुर्डे येथील सरकारी खजिना लुटला. १८२५ साली त्याजकडे सर्व सासवड प्रांतांतल्या रामोशांचें आधिपत्य आलें. १८२७ साली उमाजीस पकडण्याकरितां १२०० रुपयांचे बक्षीस सरकारांतून लावण्यांत आलें. याच सुमारास कोल्हापूरकर बोवासाहब महाराज यांचे कारकीर्दीत जे बंड झाले त्यांत मदत करण्याकरितां उमाजीप्रभृति रामोशांस पाचारण झालें होतें. या वेळी उमाजी हा खंडण्या वसूल करूं लागला. सन १८२७ सालीं खुद्द गव्हर्नरसाहेब यांस धमकीचे पत्र पाठविण्यापर्यंत त्याची मजल गेली. तथापि त्याला पकडण्याच्या कामी सतावून गेल्यामुळे सरकारने त्यास आजवर घडलेल्या खुनांची व दरोड्यांची माफी करून आपल्या नोकरीला ठेवण्याचा निश्चय केला ! तहाचें बोलणें सुरू झालें; व कन्हेपठार येथील खंडोबाच्या देवळांतील अबदागिन्या डोक्यावर धरवून शिंगें, तान्या, कर्णे, बगैरे बाझें लावून शेंदीडशे रामोशांचा घोळका घेऊन चौया उडवीत एखाद्या लहानशा राजाप्रमाणें उमाजी हा इंग्रजी फौजेच्या कमांडिंग ऑफिसरास भेटण्यास गेला ! १८२८ पासून उमाजी दरोडे न चालतां दरोडे हुडकून काढण्याच्या कामी दंग होऊन गेला होता. उमाजी- ला महिना तीस रुपये पगार ठरून त्याच्या हाताखाली पांच नाईक, बहात्तर रामोशी व एक कारकून असा सरंजाम देण्यांत आला. वर्षे एक वेगळे संस्थानच स्थापित झालें ! उमाजी नाईकाची कचेरी भरू लागली.