पान:इतिहास-विहार.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६
केळकरांचे लेख

काळपर्यंत पुणे व सातारा जिल्ह्यांत पुरुषास बायका करून सोडल्या होत्या; आणि खुद्ध इंग्रज सरकारच्या पदरी एवढे मोठें लष्कर असतां प्रजेच्या सुरक्षितपणाविषयीं त्यांना रात्रंदिवस काळजी उत्पन्न करून सोडली होती. हा पुरुष म्हणजे उमाजी नाईक रामोशी हा होय. उमाजीनें आपल्या समकालीन युरोपियन लोकांवर अंगच्या शौर्यादि गुणांनी इतकी छाप बसविली होती की, त्याजबरोबर युद्ध करून त्यांस जिंकणान्या कॅप्टन मॅकिंटाश नांवाच्या सरदारास त्याचें चरित्र आपल्या हातानें लिहून ठेवावेंसें वाटलें. मग एतद्देशीय लोकांत त्याचे पोवाडे गाइले गेले व तो दरोडेखोर होता है क्षणभर विसरून ते पोवाडे गाणारे व ऐक- णारे हैं वीररसपरिपूर्ण अशा त्याच्या चरित्रवर्णनांत आणि श्रवणांत तल्लीन होऊन गेले यांत नवल नाहीं. आजपर्यंत हें चरित्र मराठी वाचकांस केवळ पोवाड्यांतच उपलब्ध होते; परंतु इतिहाससंशोधनाची जी लाट महाराष्ट्रामध्यें उठली आहे तिच्या योगानें उमाजी नाईक 'रामोशी'हि उदयास यावा, ही गोष्ट साहजिकच आहे. कारण इतिहास प्रसिद्धीला फक्त गुणोत्कर्षाचीच अपेक्षा असते. वय व लिंग यांप्रमाणे जातीहि इतिहास लक्षांत घेत नाहीं. एवढेच नव्हे तर दुर्दैवानें सद्गुणांप्रमाणें उत्कृष्ट अवगुणांचाहि परामर्ष इतिहास घेतो. इतिहासलेखकांकडून वर्णन होण्यास सद्गुण काय किंवा दुर्गुण काय दोन्ही लोकोत्तर असावे लागतात. ऐतिहासिक दृष्टीला सज्जनांइतकेच दुर्जनहि संग्राह्य वाटतात; पण ते दुर्जन झाले तरी असे असावे लागतात कीं, त्यांच्या योगानें समाजावर त्यांची म्हणून कांहीं वेळ छाप पडलेली असली पाहिजे.

 इतिहासाला कसोटीपेक्षां चाळणीचीच उपमा अधिक यथार्थ आहे. चाळणीच्या छिद्रांतून जो जो म्हणून बारीक पदार्थ असेल तो तो खाली गळून दृष्टीआड होतो; फक्त मोठा व डगळ असेल तोच चाळणीत राहतो --मग ती वाळू असो, धान्य असो, हिरे असोत की मोत असो. इतिहास म्हणजे केवळ 'संतलीलामृत' असतें किंवा असावें अशी ज्याची कल्पना असेल त्यास ऐतिहासिक विज्ञानाचें इंद्रियच नाहीं, त्याला इतिहासाचें खरें मर्मंच कळले नाही, असें खुशाल म्हणावें. 'संसार विचित्र आहे म्हणूनच तो रम्य आहे आणि याकरितां जगांत दुर्जन असावे, त्यांच्याशिवाय चालणार