पान:इतिहास-विहार.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुंबई व इंग्रज

१३३

 खुद्द मुंबई बेट फ्रे कुक यानें १६६१ च्या तहाअन्वयें १६६५ साली पोर्तुगीज लोकांकडून आपलेकडे घेतलें. त्या वेळीं त्यांत पांचसहा गढ्या, पांचचार पितळेच्या तोफा, शिंदीच्या व नारळाच्या झावळ्यांनीं शिवलेल्या छपरांची घरें, व आठदहा हजार कोळ्यामाळ्यांची वस्ती; इतक्याच काय त्या मिळकतीच्या वस्तू होत्या. आज धनाढ्य व अव्वल दर्जाच्या सुखवस्तु बंगलेवाल्यांनी व्यापलेली 'मलबार हिल' हें त्या वेळीं निवळ गायरान असून, सगळ्या डोंगरावरील कुरणाचें उत्पन्न सालिना फार तर पन्नास रुपये असेल. इंग्रजांच्या हातीं मुंबई बेट आले त्या वेळीं खाली गोव्यास पोर्तुगीज, देशावर विजापूरचा बादशहा, घाटमाथा व कोंकण येथे मराठी राज्यसंस्थापक शिवाजी, व उत्तरेकडे मोगल अशा चारहि बाजूंनी राजसत्तेस तणावे लागले होते. सुरतेच्या वखारवाल्यांची दुर्दशा मोगल सुभेदार वेळोवेळीं मनास वाटेल तशी करीत असे, जंजिरा, चौल आणि मुंबई या तीन ठिकाणां- खेरीज बाकी सर्व कोकणपट्टीचा मुलूख शिवाजीच्या हातीं होता; व शिवाजी मुंबई बेटावर केव्हां उतरेल याचा नेम नसे. जंजिऱ्याच्या शिद्दीचें सैन्य मधून मधून मुंबईवर येत असे. हल्ली मुंबई सरकारच्या ठरावांवर 'जंजिरे मुंबई' असा पत्ता लिहिलेला असतो. तो वाचणारास सन १६७८ साली जंजि-याच्या शियाने वीस हजार फौजेनिशीं शेवरीवर उतरून 'जंजिरे मुंबई' -- अर्थात् मुंबईचा किल्ला - यास वेढा दिला होता, है बाचतांना इतिहासाच्या अघटित घटनापटुत्वाचें कौतुक वाटतें. सन १६९२ साली प्लेग येऊन गेल्या- वर सुमारें दोनचार मुलकी अधिकारी व सवारों शिपाई एवढीच कायती मुंबईस इंग्रज लोकसंख्या असल्याचा दाखला सांपडतो. मुंबईस नेमलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांस मधून मधून बंड करण्याची हौसा हे येई व कित्येक इंग्रज अधिकाऱ्यांनी फ्रेंचांना सामील होऊन देशद्रोहाचे व राजद्रोहाचे कट केल्याचेंहि आढळते.

 या सुमारास डच लोकांचें चोहोंकडे समुद्रावर प्राबल्य असल्यानें त्यांची लढाऊ जहाजे मुंबईच्या आसपास गोळीबार करीत असत. मुंबई- स असणारें इंग्रज लोकहि त्या वेळच्या स्थित्यनुरूप अशिक्षित व कोत्या समजुतीचे धर्मभोळे असे होते. या बाजूस येऊन पडलेल्या इंग्रजांना सहा सहा महिन्यांतहि एखादें इंग्रजांचें जहाज दृष्टीस पडण्याची मारामार.