पान:इतिहास-विहार.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुंबई व इंग्रज

मुबई शहर व इंग्रज यांचा संबंध प्रथम सन १६६१ साली जडला. अर्थात् "आम्ही हिंदुस्थानचे किंबहुना खुद्द मुंबई शहरचे फार जुने रहिवाशी आह' असा इंग्रज लोकांस अभिमान वाटणें योग्य आहे. श्रीशिवाजी- महाराजांची पुण्याची जहागीर इंग्रजांच्या मुंबईच्या जहागिरीहून थोडी अधिक जुनी आहे हें खरें. तथापि, शिवाजी महाराजांस राज्याभिषेक होण्यापूर्वी दहा वर्षे मुंबईस इंग्रज गव्हर्नर अधिकार चालवीत होता. पुण्यास पेशव्यांची वस्ती किंवा हैद्राबादेस निजामाची वस्ती होण्याच्या पूर्वीपासून मुंबईस इंग्रजांची वस्ती आहे, आणि होळकर, शिंदे, गायकवाड ह्रीं बहुमानाच नार्वे अस्तित्वात येण्यापूर्वी मुंबई हे इंग्रजांच्या सत्तेचें एक अधिष्ठान होऊन राहिलेलें होतें, अशी बढाई इंग्रज इतिहासकारांनीं मारली असल्यास ती अयथार्थ नाही. खुद्द शेक्सपियरच्या वेळी मुंबईत एकहि इंग्रजी अक्षर उच्चारले जात नव्हतें हें खरें; परंतु त्याच्या मरणापासून अर्धशतकाचे आतंच मुंबईस इंग्रजीचा प्रसार सुरू झाला होता. असो; इंग्रजांचा व मुंबई शहराचा संबंध वर सांगितल्याप्रमाणे सन १६६१ साली जडला. त्याचें कारण असे झाले की, इंग्लंडचा त्या वेळचा राजा दुसरा चार्लस याचे पोर्तुगीज राज- कन्येशीं लग्न झालें. व या लग्नांत पोर्तुगालचा राजा सहावा अल्फान्सो यानें मुंबई हें बेट या राजकन्येला आंदण दिलें. या सुमारास इंग्रजांची डोई हिंदुस्थानांत नुकती कोठें बर येऊ लागली होती. यापूर्वी सुमारे शंभर वर्षे सुरतेस इंग्रजांची वस्वार होती; पण या वखारवाल्यांचे जीवित व मालमत्ता सर्वस्वी तेथील मुसलमान सुभेदारांच्या मर्जीवर असे. पश्चिम समुद्रावरील आधिपत्य पोर्तुगीज, सिद्दी व आंग्रे यांच्या दरम्यान बांटलेलें होतें. मुंबई बंदर हातीं आल्यावरही इंग्रजांचा मुंबई इलाख्यांतील मुलूख इतका थोडा होता की, साधारण एखाद्या मनुष्यास तो सर्व एका दिवसांत पायानें आक्रमित येत असे! या एकंदर जहागिरीचे उत्पन्न सालाचें तीस हजार रुपयेहि भरण्यासारखें नव्हतें.


  • केसरी, ता. १५ डिसेंबर १९११