पान:इतिहास-विहार.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०
केळकरांचे लेख

एकांतिक व अवमानकारक अशीं विधानें करण्याचा मोह त्यांना सुटत नाहीं. पण संशोधक या नात्यानें त्यांच्या मनोरचनेंत सफाई किंवा मृदुता नसली तरी, त्यांच्या मनोरचनेच्या कोणत्याहि ओबडधोबड भागांतून देखील बुद्धिमत्तेचें तेज मात्र झळकल्याशिवाय रहात नाहीं. त्यांच्या धाडसा मुळें अलौकिक कल्पना लोकांपुढे विचारास येण्यास मदत होते. शिवाय त्यांच्या बुद्धीच्या अष्टपैलूपणामुळे व्यापक समाजशास्त्रापैकी एक भाग या नात्यानेंहि इतिहास व वाङ्मय यांचा परामर्ष त्यांना घेतां आला आहे.

 वरील सर्व संशोधकांच्या उद्योगानें ऐतिहासिक साधनांचे आजपर्यंत लहान मोठे असे सुमारें ३५ खंड छापून प्रसिद्ध झाले आहेत. परंतु प्रसिद्ध झालेले कागदपत्र प्रसिद्ध न झालेल्या कागदांच्या मानानें फारच थोड़े आहेत. रा० पारसनीस, खरे व राजवाडे यांच्या संग्रहीं, रा० राजवाडे यांच्या अदमासाप्रमाणे, अनुक्रमें २०, ३० व ५० हजार पत्रे असून दर- खंडास सुमारें ५०० पृष्ठांप्रमाणें या कागदांचेच मुळीं १२५-१५० खंड छापून होतील, आणि अनुपलब्ध सामुग्री तर इतकी असावी कीं, तिचे कदाचित् १००० - १५०० हि खंड होतील ! कारण ही सामुग्री अद्याप चोहोंकडे पसरलेलीच आहे. आजपर्यंत उपलब्ध झालेल्या साधनांत अठराव्या शतकांतील इतिहासाची साधनें बरीचशीं उपलब्ध झालेलीं आहेत; व सतराव्या शतकांतील म्हणजे शिवकालीन इतिहासाची साधनें हल्लीं थोडींशी सांपडूं लागलीं आहेत; परंतु तेराव्या शतकापासून सतराव्या शतकांपर्यंतच साधनें अद्यापि जवळ जवळ कांहींच मिळाली नाहीत असें म्हटलें तरी चालेल, देवगिरी, विजयनगर वगैरे ठिकाणी या काळांत जिवंत मराठी राज्ये होती; पण त्यांविषयीं अस्सल कागदपत्रांनीं शाबीत झालेली अशी माहिती आपणांस कितीशी आहे ? मग तेराव्या शतकापूर्वीच्या महाराष्ट्रा- च्या इतिहासाची तर गोष्ट बोलावयासच नको. इतिहास संशोधनाचा टापू ग्वालेरीपासून तंजावरापर्यंत पसरलेला असून हल्लींचे दहा पांच तुटपुंजे इतिहास संशोधक एवढ्या कामाला कसे पुरे पडणार ? बरें, संशोधक अधिक निर्माण झाले तरी त्यांनी मिळविलेल्या सामुग्रीचा उपयोग ती प्रसिद्ध झाल्याशिवाय लोकांस कसा होणार? अर्थात् या कामी संशोधकांप्रमाणें धनिकांचेंहि साहाय्य पाहिजे, कदाचित् इतर धनिक राहोत; परंतु जी