पान:इतिहास-विहार.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
केळकरांचे लेख.

व्यवहाराच्या क्षुद्र बाबतीतहि कार्यकारणाची सांखळी परमेश्वराच्या पाया- पर्यंत नेऊन पोचविण्याची संवय त्यांना लागलेली होती. इतिहासाचा परामर्ष कोण घेतलाच तर तो धर्माध्यक्षांनी. पण ते मांडतील तींच प्रमेये व मानतील तींच प्रमाणे अशी स्थिति होती; यामुळे इतिहासाला शास्त्रीय स्वरूप येणें शक्य नव्हते.

 " इतिहास-संशोधनाच्या पूर्वतयारीचा प्रारंभ युरोपखंडांत १६ व्या किंवा १७ व्या शतकांत झाला. कारण या सुमारास युरोपियन विद्या व भौतिक ज्ञान हीं दोनहि वाढण्यास सुरुवात झाली होती. आणि युरोपांत जी स्थिति १७ व्या शतकांत आली ती गेल्या शतकाच्या अखेरीस आमच्या देशांत आली. या काळापूर्वी वर सांगितल्याप्रमाणे, शब्दप्रामाण्य व श्रद्धा हीं वावरत होतीच; पण शिवाय आजच्या मानानें. त्या वेळीं शिक्षणाचे क्षेत्राहि संकुचित होते. इतर प्रांतांतील राहो, पण महाराष्ट्राचेच उदाहरण आपण घेऊ. मराठेशाहीतील किंवा पेशवाईतील शिक्षणक्रम पाहिला तर असे दिसून येतें कीं, वेदशास्त्रांचे पठनपाठन, आणि तत्सं- बंधीं ग्रंथलेखन व वादविवाद हाच विद्वत्तेचा व विद्याव्यासंगाचा मुख्य प्रांत. व्यवहारांत पडणाऱ्या सुशिक्षित लोकांना आमच्यापेक्षां पुष्कळे. अधिक महत्त्वाची कामे त्या वेळीं करावयाचीं होतीं याबद्दल वाद नाहीं. कारण खुद्द इतिहास निर्माण करणे ही गोष्ट ऐतिहासिक चिटोरीं गोळां करण्यापेक्षां अधिक महत्त्वाची असें कोणीहि म्हणेल. पण सांगितले तर कदाचित् आश्चर्य वाटेल की, वेदशास्त्र हें सोडून दिलें तर अक्षर, गणित, हिशेब, बखरी, तवारिखा, विक्रमबत्तिशी, वेताळपंचविशी, लटकचाळिशी, भारत-भागवत- रामायण यांतील आख्यानांच्या बखरी यांचे वाचन, स्तोत्रे व काव्यांतील उताऱ्यांचे पठन, जमाखर्चाच्या पद्धति, भूमापन, पत्रव्यवहाराचे मायने -- हेंच काय तें मुख्यतः त्या वेळचें 'उदार शिक्षण" असून, वर सांगितलेल्या महत्त्वाच्या कार्मात न पडणाऱ्या निष्क्रिय विद्या- व्यासंगीयांचीहि भजल यांपलीकडे फारशी जात नसावी. शिवाय बाहेरच्या जगाश दळणवळण कमी होते, छापण्याची कला माहीत नव्हती. विशिष्ट धर्मदृष्टीमुळे देशांतील जगाशदि व्यवहार संकुचित होता. आणि ज्याला आज ऐतिहासिक दृष्टि किंवा तुलनात्मक चिकित्सा बुद्धि असे आपण