पान:इतिहास-विहार.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०
केळकरांचे लेख

पत्रे लिहिणा-या अशा स्त्रिया दोनच आढळतात. एक श्री. गोपिका- बाईं व दुसरी सत्यभामाबाई, गोविंद हरीची बायको. गोपिकाबाईच पेशव्यांचे दरबारांत किती वर्चस्व असे हें सुप्रसिद्धच आहे. नानासाहेब पेशवे असतां तिनें त्यांच्या मनांत रघुनाथराव व सदाशिवरावभाऊ यांच्यासंबंधानें अनेक मत्सराच्या कल्पना भरवून दिल्या. नानासाहेबांच्या पश्चात् तिचाच मुलगा मुख्य पेशवा असल्याकारणानें व विशेषतः तो अल्पवयस्क असल्याने तिची राज्यकारभारांत ढवळाढवळ चाललेली असें. रघुनाथरावानें माधवरावाचा मोड केल्यामुळे तिला स्वस्थ बसणें भाग पडलें व त्यामुळे ती उदास असे. परंतु तिचा सारा हेतु आपला मुलगा व आपण यांचे हातीं सर्व सत्ता यावी असा असे व गोपाळराव पटवर्धन मोंगलाकडे गेला असतां त्याचे हातून, आपला हेतु सफळ करणारे कांहीं तरी धाडसी व गुप्त कृत्य करावयाचे तिचे मनांत असावें असाहि गोविंद हरीचे एका पत्रामधून ध्वनि निघतो. गोपाळ- रावाची आई. सत्यभामा इचें एक पत्र आहे तें फार मौजेचे आहे. गोपाळ- रावाचें दुसरें लग्न करावयाचे असल्यानें कोंकणांतून वधू आणिविल्या होत्या व त्या येऊन खोळंबून बसल्या तरी गोपाळरावाचा ठिकाण लागेना. त्यानें घाईनें येऊन एकदांचें कार्य उरकून घेऊन जावें असें गोविंद हरीनें त्यास कित्येक वेळां लिहिलें; परंतु गोपाळराव ऐकेना. तेव्हां वर सांगितलेले पत्र सत्यभामाबाईने आपल्या मुलास मोठ्या रागानें लिहिलें. ( पत्र नं. २८० ) " नवरी वाईट, आम्हांस परिछिन्न करणें नाहीं म्हणून पत्र आलें. त्यावरूनं अपूर्व वाटले. पाटणकर मामांनी नवरी बाईट आणिली म्हणोन लिहिलें, त्यांस आणावयास गरज काय ? कांहीं पैसा तुमचे लग्नांत पाटणकर मिळवीत नाहींत. इतकेंही असून वाईट असती तर आम्ही काय सर्व वेडीं होतों कीं काय ? आणि तुम्ही मात्र शहाणपणें लिहितां ! दहापांच, मुलींत नवरी चांगली आहे. दहापांच हजारांत चांगली ती तुम्ही करणार. तशी कोण मिळणार १ एक पुण्यांत मिळणार तें पुर्णे दारोदार भटकावयास लागले. आणि तुम्हींहि तसेच, आम्ही पहिलीं माणसें, दहापांच हजारांत चांगली आणावी इतकी परीक्षा आम्हांस नाहीं. तुम्हापाशीं कोण परीक्षवत असेल. त्यास सत्वर पाठवून देणें. अधिकोत्तर काय लिहावें ?" असे