पान:इतिहास-विहार.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

१०७

- ६ -

हेतिहासिक लेखसंग्रहांतील बहुतेक पत्रांत पटवर्धनांविषयींचीच जशी माहिती पुष्कळ मिळते तशी इतरांसंबंधाने मिळत नाहीं. खुद्द श्री० माधवराव पेशवे यांचीं थोडींशी पत्रे ऐ. ले. संग्रहांत प्रसिद्ध झाली आहेत; त्यांवरून श्रीमंत माधवराव हे मोठे मातृभक्त होते. एवढे मात्र दिसते.. त्यांच्या कारकीर्दीच्या अगदी अव्वलींतच, रघुनाथरावांचा मूर्खपणा,- सखारामबापूंचें कपटपटुत्व, इतर सरदारांचीं दुटप्पी वर्तने यामुळे त्यांजवर मोठाच बिकट प्रसंग येऊन पडला होता. त्र्यंबकराव मामा व बाबूराव फडणीस हे मुख्य कारभारी रघुनाथरावाच्या चंचळ व बेभरवशी स्वभावा- मुळे कारभार करण्याचे पत्करीनात, व सखारामबापूवर माधवरावाचा स्वतःचा विश्वासहि नव्हता. तेव्हां कारभाऱ्यांनी कसेंहि करून कारभार करण्याचे पत्करावें म्हणून त्यांना कलमवार तहनामे लिहून द्यावे लागले.या सर्व घोटाळ्यांत माधवरावानें आपली आई गोपिकाबाई हिच्या आशे-: प्रमाणे वर्तन ठेविलें होते. आंगीं तारुण्य व हात सर्व सत्ता अशी उन्माद-- कारक स्थिति असतां केवळ आपल्या आईच्या वचनाप्रमाणे चालणारे असे किती लोक सांपडतील ! माधवरावाचा स्वभाव प्रेमळ व श्रद्धालु असावा असें दिसतें. त्यास माणसाची जरी परीक्षा होती तरी दुसऱ्याचे- दोषांवर होता होईल तों पांघरूण घालण्याची त्याची वहिवाट असे.चुलत्या पुतण्यांची लढाई होऊन समेंट झाल्यावर रघुनाथरावांसंबंधानें माधव- रावाने आपले मत गोपिकाबाईस कळविले, त्यांत असें लिहिलें आहे. " नाना- प्रकारचें वर्तमान मनस्वी लोक सांगतात व लिहितात तो प्रकार येथे किमपि नाहीं. वडिलीं चित्तांत दुसरा अर्थ आणू नये. तीर्थरूपांचे चित्त बहुत कोमल आहे. समाचार वरचेवर घेतात. दिवसेंदिवस अधिकोत्तर चित्त कोमल होईल." माधवरावासंबंधाने इतरांच्या पत्रांतून जे उल्लेख आले आहेत. ते त्यास भूषणास्पद असेच आहेत. पटवर्धनांची वाताहात झाली असतांहि गोविंद: इरि अगर गोपाळराव यांचेच पत्रात कोठें त्याजविरुद्ध ब्रूहि काढलेला आढळत नाहीं. मिरजेच्या वेढर्भात खुद्द माधवराव हजर होते व त्यांनी आपली बाजू संभाळावी अशी पटवर्धनांची अपेक्षा असतां माधवरावानें रघुनाथरावांचे म्हणणे ऐकून पटवर्धनांची जहांगीर काढून घेतली होती.