पान:इतिहास-विहार.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
केळकरांचे लेख

आहेत अशा स्थितीत भलतेच कथाभाग योजून खचाखोट्यांचें बेमालूम मिश्रण करून केवळ कल्पनेला गोड दिसतील असे ऐतिहासिक चित्रपट अलंकारिक वर्णाक्षरांनी रंगविणे हे आमच्या मतें आमच्या इतिहासास अत्यंत घातक आहे.

- ४ -

आतां हे जुने कागदपत्र वगैरे कसे व कोठें मिळणार, हा प्रश्न राहिला.. मराठ्यांच्या समर्पक व विश्वसनीय इतिहासाची साधनसामुग्री केवळ जुन्या बखरी, इंग्रज ग्रंथकारांनी लिहिलेले हिंदुस्थानचे इतिहास, किंवा 'ऐतिहासिक' या वर्णनाखालीं मोडणारी नाटके व कादंबया यांमध्यें मिळणार नाहीं हैं येथवर केलेल्या विवेचनावरून दिसून आलेच असेल. । तसेंच ही सामुग्री मुख्यतः जुन्या कागदपत्रांमधूनच मिळविली पाहिजे हॅहि सांगितलेंच आहे. पेशवाईचा वास्तविक नाश झाल्यापासून आज जवळ जवळ १०० वर्षे होत आली. इतका वेळपर्यंत झोंपा काढून आतां कोठे आम्ही जागे झालों आहों. परंतु सर्वभक्षक काळास कधींहि झोप येत नाहीं. या शंभर वर्षीत त्याने आमच्या इतिहासाची सामुग्री किती खाऊन टाकिली असेल याची बरोबर कल्पना करणे फार कठीण आहे. यामुळे इतक्या कालावधीनंतर इतिहासाच्या जीर्णोद्धाराचें काम करावयाचें म्हणजे, जळून खाक झालेल्या किंवा धरणीकंपाने जागचेजागी गडप झालेल्या वाड्यांतून मालमिळकत उकरीत बसण्यासारखेच आहे. रोमच्या इति- हासांतील सिविलच्या ज्ञानपूर्ण ग्रंथाप्रमाणे, जे आम्ही अनास्थेनें घालविले त्याच्याचमुळे ज़े अजून शिल्लक उरले आहे त्याची किंमत अनंतपटीने वाढली आहे. जें गेलें परत येणार नाहीं हें तर उघडच आहे. परंतु जे उरले आहे तेवढे सर्व जरी हस्तगत करून घेता आले तरी कांहीं कमी नाहीं. जळकें किंवा जमीनदोस्त झालेलें घर उकरीत असतांहि अमोलिक जिनसा पुष्कळ वेळीं अचानक सांपडतात हा अनुभव नेहमी येतोच. भारतीय युद्धांत कित्येक अक्षौहिणी सैन्याचा ज्या रणांगणांत संहार झाला,