पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/९५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८५ )
नारायणराव व्यंकटेश.

अंमलदार होते त्यांनी करवीरकरांशीं युद्ध केलें व त्यांच्या तालुक्यांत थोडीबहुत लुटालूटही केली. या लुटालुटींत आणखी झटपट होऊन यांनी त्यांचीं कांहीं घोडी वगैरे लुटून आणिलीं. मग " सालगुदस्तप्रमाणें तुमच्या वतनबाबेचा ऐवज सुदामत चालेल. सामानासुद्धां घोडीं व लूट परत द्यावी " असे करवीरकरांनी त्या अंमलदारांस पत्र पाठविले. त्यामुळे तात्या व अनूबाई स्वारीहून परत आल्यावर उभयपक्षीं सलोखा झाला.
 पावसाळा होतांच श्रीमंत पुन्हा स्वारीस निघून मोंगलाईच्या रोखें चालले. हिंदुस्थानांत पानपतचे मुक्कामीं भाऊसाहेब यांस अब्दालीनें कोंडिल्यामुळें त्यांच्या कुमकेस श्रीमंतांच्या मनांत जावयाचें होतें. जातांना निजामअल्लीस बरोबर न्यावयाचा त्यांनीं मनसबा ठरविला होता. त्यामुळें त्यास आणण्याकरितां त्यांनीं रघुनाथराव दादासाहेबांस फौजेसह पुढें पाठविलें. नाराणरावतात्या आपल्या फौजेची तयारी करून श्रीमंतांच्या स्वारींत दाखल झाले तेव्हां त्यांस दादासाहेबांकडे जाण्याविषयीं श्रीमंतांची आज्ञा झाल्यावरून ते दादांसाहेबांस जाऊन मिळाले. त्यांबरोबर तीन महिनेपर्यंत ते तिकडेच हिंडत होते. पेशव्यांची स्वारी नर्मदेपलीकडे गेली तेव्हां त्यांच्या फौजेंत इचलकरंजीकरांचीही एक टोळी होती.

 या म्हणजे सन १७६१ सालीं अनूबाई पेशव्यांच्या स्वारीबरोबर न जातां इचलकरंजीसच राहिल्या. याचें कारण शेजारी करवीरकरांच्या राज्यांत आतां राज्यक्रांति होण्याचा समय जवळ येऊन ठेपला होता. अलीकडे अलीकडे संभाजीमहाराज वार्धक्यानें व दुखण्यानें बहुत जर्जर झाले होते. त्यांच्या सात राण्या होत्या त्यांत थोरली जिजाबाई हीच राज्याचा कारभार पहात असे हें मागें सांगितलेंच आहे.