पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८४ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

 सन १७५९ च्या अखेरीस मराठ्यांची व मोंगलांची लढाई सुरू झाली. पेशव्यांचे बंधु भाऊसाहेब व दादासाहेब बरोबर मोठी फौज घेऊन बेदरच्या रोखें चालले व वेळ पडल्यास त्यांस कुमक करितां यावी म्हणून खुद्द पेशवे अहमदनगर येथें तळ देऊन राहिले. व्यंकटरावांचें लग्न उरकून अनूबाई व तात्या फौजेसह निघून प्रथम नगरास गेलीं. बाई तेथेंच श्रीमंतांजवळ राहिल्या. उदगीर येथें भाऊसाहेब व दादासाहेब होते व त्यांची मोंगलांशीं कलागत सुरू झाली होती, सबब त्यांच्या लष्करास मिळण्याकरितां नगराहून निघून ता. २ फेब्रुवारी सन १७६० या दिवशीं नारायणरावतात्या उदगीर येथें दाखल झाले. परंतु ते तेथें पोचण्याच्या आधीं त्यांच दिवशी तेथे मराठे व मोंगल यांमध्ये मोठे युद्ध होऊन मोंगलांचा पूर्ण पराजय झाला होता. मोगलांपासून ६२ लक्षांची जहागीर घेऊन भाऊसाहेब व दादासाहेब पेशव्यांस येऊन मिळाले. नंतर भाऊसाहेब पानपतच्या स्वारीस गेले. थोडेसे मुलूखगिरीचे दिवस शिलक होते म्हणून पेशव्यानीं एक फौज रास्ते व पटवर्धन यांजबरोबर कर्नाटकाच्या स्वारीस रवाना केली व मागून नारायणरावतात्यांसही मुतालकीचा शिक्का देऊन ता. २९ एप्रिल रोजीं कर्नाटकप्रांतींच एका स्वतंत्र मोहिमेवर पाठविलें.
 देशमुखी वतनासंबंधें इचलकरंजीकरांशीं करवीरकरांच्या नेहमीं कटकटी होत असत. शेजारच्या कोणाही सरदाराशीं करवीरदरबारचें नीट नव्हतेंच. पण त्यांतले त्यांत इचलकरंजीकरांवर त्या दरबाराचा राग विशेष होता. पेशवे व पटवर्धन यांचें पाठबळ असल्यामुळें व स्वतः फौजबंद असल्यामुळें इचलकरंजीकरही कोल्हापूरकरांस फारसे वचकत नसत. यंदांच्या पावसाळ्याच्या प्रारंभ करवीरकरांनीं इचलकरंजी व नांदणी येथें येऊन गुरें वळून नेलीं व कडब्याच्या गंजी जाळल्या. तेव्हां इचलकरंजींत गोविंद महादेव व शिदोजी जगताप म्हणून