Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८२ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.


कल्याण होणार ' अशा भावनेनें अनुबाई नारायणरावतात्यांस जन्मभर वागवीत गेल्या. व्यवहारांत जशी भावना धरावी तसेंच फळ मिळावें असें पुष्कळदा घडतें. तात्यांच्या उदाहरणांत याप्रमाणेच घडलें नसेलसें कशावरून ! तात्या हे सरदारीचे मालक नांवाचे मात्र होते. परंतु कर्तृत्वाचा विकास योग्य दिशेनें होण्यास ज्या क्रियास्वातंत्र्याची अपेक्षा असते, तें क्रियास्वातंत्र्य तात्यांस कधींच मिळालें नाहीं. अनूबाई सांगतील तें काम त्यांनीं केलें तरी बरें, नाहीं तरी बरें, अशी स्थिति होती. अमुक काम त्यानीं न केलें तर संस्थानाच्या कल्याणास बाध यावा अशी स्थिति अनुबाईंनीं ठेविलीच नव्हती ! हरिराम हेरवाडकर व विसाजी नारायण हे बाईंनीं वाढविलेले सरदार त्यांच्या आज्ञेप्रमाणे पथकासह कोणतीही लष्करी कामगिरी बजावण्यांत तत्पर होते. संस्थानच्या मुलकी कारभारांत बाईंचे दिवाण भिकाजी नरहर व पुढें पुढें महादाजी विठ्ठल दातार हे कोणचेंही न्यून पडूं देत नव्हते. या सर्व गोष्टींचा परिणाम तात्यांच्या मनावर प्रतिकूल रीतीचा होऊन बाईंच्या ओंजळीनें पाणी पिण्याचा त्यांस कंटाळा येऊं लागला. संस्थानात लबाड लोक असतात ते असा प्रसंग उत्पन्न झाल्यास त्याचा फायदा करून घेण्यास टपलेलेच असतात. तसल्या लोकांनीं नारायणरावतात्यांस भर देऊन आई व तिचे कारभारी यांविषयीं त्यांच्या मनांत वितुष्ट उपन्न केलें.
 सन १७५७ च्या प्रारंभीं नानासाहेब व भाऊसाहेब श्रीरंगपट्टणच्या स्वारीस आले. या स्वारींत अनूबाई हजर नव्हत्या. नारायणरावतात्या धारवाड प्रांतीं फौजेसह होते त्यांस श्रीमतांच्या स्वारींत हजर रहाण्याविषयीं अनूबाईंनी लिहून पाठविलें, तेव्हां वर सांगितलेल्या वितुष्टाच प्रकार प्रथम उघडकीस आला. कारण कीं, तात्या श्रीमंतांबरोबर स्वारीस गेले नाहींत. पराक्रमगड म्हणून धारवाड प्रांतीं