Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८३ )
नारायणराव व्यंकटेश.

कोठें किल्ला आहे तेथचा बंदोबस्त करण्याच्या मिषानें तात्यांनीं मुलुखगिरीस जाण्याचें चुकविलें. अनूबाईंच्या हातीं कांहीं सत्ता नसावी, सर्व कारभार आपल्या हातीं असावा, मन मानेल त्याप्रमाणें वागण्यास आपणास कोणाची आडकाठी नसावी, ही त्यांची इच्छा आतां उघड रीतीने दिसू लागल्यामुळें मायलेकरांत सहजच विरोध उपन्न होऊन दौलतींत बखेडा करणाऱ्या लोकांची पोळी पिकावी असा प्रसंग उत्पन्न झाला. श्रीरंगपट्टणची स्वारी आटोपून श्रीमंत परत पुण्यास गेले तेव्हां अनूबाईंचे म्हणणे असे पडलें कीं, तात्यांनी इचलकरंजीस यावें व आपणाबरोबर पुण्यास श्रीमंतांकडे जाऊन आपल्या सरदारीचे व दौलतीचे लढे उलगडून घ्यावे. परंतु तें त्यांच्या मर्जीस येईना. ते सन १७५९ त व्यंकोबाच्या गिरीस यात्रेकरितां व नवरात्राच्या उत्सवासाठीं गेले. तिकडे दीड महिना राहून ते धारवाडाकडे परत आले. मग बाईनीं धारवाडास जाऊन मामलतीचा बंदोबस्त केला व तात्यांची कांहींशी समजूत काढून त्यांस घेऊन त्या परत इचलकरंजीस आल्या.

 नारायणरावतात्यांस तीन अपत्यें होतीं. थोरला मुलगा व धाकटया दोघी मुली. मुलाचें नांव व्यंकटरावदादा व मुलींचीं नांवें अनुक्रमें बयाबाई व सगुणाबाई अशीं होतीं. व्यंकटराव हे आतां पांच सहा वर्षांचे झाले होते. त्यांची मुंज वैशाख शु. १० शके १६८० ( तारीख १७ मे सन १७५८ ) या दिवशी झाली व त्यांचें लग्न शके १६८१ च्या मार्गशीर्षात ( इ. स. १७५९ च्या नोव्हेंबरांत ) झालें. पुण्यास भिडे म्हणून सावकार होते त्यांची कन्या व्यंकटरावांस दिली होती. तिचें नांव रमाबाई. तिचीच चुलत बहीण पांडुरंगराव गोविंद पटवर्धन यांस दिली होती.