पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/९०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८० )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

हरिराम यांस धारवाड प्रांतीं छावणीस ठेवून त्या प्रांताची मामलत पटवर्धन, इचलकरंजीकर व विठ्ठल विश्राम या तिघांस सारखी वाटून दिली. पूर्वीचा व हल्लीचा नवीन मिळालेला मुलूख मिळून हा धारवाडचा सुभा इचलकरंजीकरांचे ताब्यांत आला त्या वेळीं या सुभ्याचे क्षेत्र फार मोठें असून त्याखाली १ मिश्रीकोट, २ धारवाड, ३ देवरहुबळी, ४ अमीनबावी, ५ तडकोड, ६ मारडगी, ७ कलघटगी, ८ नरेंद्र, ९ बेटगिरें, १० एकोडी, ११ नवलगुंद, १२ तोरगल, १३ गोकाक, असे परगणे होते. खुद्द धारवाडचा किल्ला अनूबाईंच्या ताब्यांत होता. बाकींचीं ठाणीं व परगण्यांतील किल्ले बाईंनी आपल्या तर्फेनें त्या त्या परगण्याच्या मामलेदारांच्या ताब्यांत दिले होते. याशिवाय वल्लभगड, पारगड, भीमगड, कलानिधि, खानापूर व चंदगड ही ठाणीं व कित्तूर संस्थानांपैकीं बागेवाडी हीं सर्व गेल्या तीन सालांत पेशव्यांनी इचलकरंजीकरांच्या हवाली केलीं होती. परगणा कंकणवाडी हाही त्यांजकडे पेशव्यांकडून मामलतीनें होता, पण तो कधीं मिळाला याची माहिती मिळत नाहीं. एवढा हा मोठा धारवाडचा सुभा जो इचलकरंजीकरांकडे दिला होता त्याचा वसूल सरकारांत नियमितपणें यावा म्हणून येसाजीराम व रामचंद्र नारायण हे पेशव्यांच्या तर्फेनें सुभ्याची वहिवाट करण्यास नेमिले होते व वसुलाबद्दल पेशव्यांस व बंदोबस्ताबद्दल इचलकरंजीकरांस ते जबाबदार होते. रायबागची कमाविशी पेशव्यांकडून नारायणरावतात्यांस मिळाली होती तींही गोष्ट याच सुमारास किंवा यापूर्वीं एक दोन वर्षे झाली असावी.

 मर्दनगड हा किल्ला गोव्याच्या हद्दीवर असल्यामुळें तो मराठ्यांच्या ताब्यांत गेलेला पहातांच गोवेकरांचें पित्त खवळलें. त्यांनीं मोठ्या फौजेसह येऊन त्या किल्ल्यास वेढा घातला. पण येसाजीराम