होत असे. सन १७५५ च्या मे महिन्यापर्यंत हा मजकूर झाला. नंतर पुरंदरे यांनीं हणमसागर, होनगुंदे, मुद्गल व रायचूर येथील खंडण्या घेऊन परत पुण्यास जावें व नारायणरावतात्यांनी पांच हजार फौजेसह धारवाडास छावणीस रहावें याप्रमाणें पेशव्यांचा हुकूम झाल्यावरून पुरंदरे पुण्यास गेले व तात्या धारवाडास राहिले. स्वारीच्या सुरुवातीस गोकाक परगणा तात्यांनी घेतला होता याची मामलत पेशव्यांनीं त्यांसच सांगितली.
सन १७५६ त श्रीमंतांची सावनुरावर मोहीम झाली. बागलकोट, बेळगांव, शहापूर, मिश्रीकोट हे सावनूरच्या नबाबाचे महाल व ठाणीं घेऊन श्रीमंतांनीं सावनुरास वेढा घातला. तात्या व अनूबाई येथपर्यंत या स्वारींत हजर होती. पुढें तात्यांच्या शरीरीं आराम नसल्यामुळें ते परत इचलकरंजीस आले. परंतु विसाजी नारायण, हरिराम, येसाजीराम, रामचंद्र नारायण वगैरे सरदार व मुत्सद्दी व फौजसुद्धां अनूबाई श्रीमंतांच्या स्वारीबरोबर राहिल्या. सावनूर जेर झालें तेव्हां तेथील नबाबाने श्रीमंतांस अर्धे राज्य देऊन तह करून घेतला. नंतर सोंदे संस्थानावर स्वारी करण्याकरितां गोपाळराव पटवर्धनांची रवानगी झाली. त्यानीं तेथच्या संस्थानिकापासून अडीच लक्ष रुपये रोख घेतले व मर्दनगड किल्ला घेतला. पूर्वी हा किल्ला व्यंकटराव घोरपडयांनी सोंदेकरांपासूनच घेतला होता व कांहीं वर्षे तो त्यांच्या ताब्यांतही होता. परंतु ज्या अर्थी हल्ली तो सोंदेकरांकडून मराठ्यांच्या ताब्यांत आला होता त्या अर्थी यापूर्वी तो व्यंकटरावांपासून सोंदेकरांनी घेतला असावा. हल्ली मर्दनगड इचकरंजीकरांकडेच ठेवावा असें मनांत आणून श्रीमंतांनीं त्यांचेच लोक किल्लयांत ठेविले. नंतर श्रीमंतांनीं गोपाळराव पटवर्धन व इचलकरंजीकरांचे कारभारी विसाजी नारायण व