पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७८ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

श्रीमंतांनीं तो किल्ला व त्याखालचा सरंजाम ताब्यांत घेतला व तेथील मामलत नारायणरावतात्यांस दिली.
 पुनः सन १७५३ अखेरीस श्रीमंत कर्नाटकच्या स्वारीकरितां आले. हरिहर, बागलकोट व मुंडरगी येथें लढाया झाल्या. जमखिंडी व तेरदाळ हे दोन परगणे श्रीमंतांनीं घेऊन जमखिंडीची मामलत पटवर्धनांस व तेरदाळची नारायणरावतात्यांस दिली. डुबळ ऊर्फ साळोंखे यांजकडे मिरजेचा किल्ला शाहू महाराजांनी दिला होता तो श्रीमंतांनी त्यांजकडून काढून आपले नूतन व्याही म्हणजे माधवराव यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांच्या हवालीं केला.
 सन १७५४ त श्रीमंत कर्नाटकच्या मोहिमेस निघून ऐनापूरपर्यंत आले. तेथें सेनापति कापशीकर त्यांच्या भेटीस पुन्हां आले होते. श्रीमंतांनीं महादाजीपंत पुरंदरे व नारायणरावतात्या यांच्या हवालीं फौज करून त्यांस मोहिमेवर रवाना केलें व आपण त्या सालीं सिंहस्थ होतें म्हणून गोदावरीतीरास परत गेले. पुरंदरे व तात्या हे निघाले असतां प्रथमच गोकाकच्या देसायाशीं त्यांची कटकट झाली. तेव्हां तों परगणा व गोकाकचें ठाणें त्यांनीं देसायापासून हिसकावून घेतलें. माजी देसायाचे दोन मुलगे तात्यांचे आश्रयास राहिले होते हें मागें सांगितलेंच आहे. या मुलांसच त्यांनी या वेळा देसगतीचें वतन देऊन त्यांची स्थापना केली व गोकाकचें ठाणें आपल्या ताब्यांत ठेविलें. देसायाच्या मुलांनी या वेळीं कृतज्ञताबुद्धीनें हुनशाळ हा गांव तात्यांस इनाम दिला. नंतर हें लष्कर श्रीरंगपट्टणापर्यंत जाऊन त्यानेंं कित्तूर, सोंदे, सावनुर, बिदनूर, चित्रदुर्ग, रायदुर्ग, श्रीरंगपट्टण, बसवापट्टण, कनकगिरी या नऊ संस्थानांपासून खंडणी एकंदर रुपये ३८७०००० घेतली. संस्थानिकांशीं खंडणीचा ठराव नारायणरावतात्या यांच्या विद्यमानें