पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७७ )
नारायणराव व्यंकटेश.

होता. या वर्षी पेशवे कर्नाटकच्या स्वारीस आले तेव्हां त्यांच्या भेटीस राणोजी घोरपडे आले होते. त्यांचे पुत्र संताजी घोरपडे यांस सरदारी व कांहीं सरंजाम द्यावा असें रामचंद्रबाबा शेणवी यांच्या आग्रहावरून पेशव्यांनी कबूल केलें होतें, परंतु ती गोष्ट संताजी घोरपडे यांनीच मान्य केली नाहीं. कर्नाटकच्या या स्वारींत नारायणरावतात्या प्रमुख सरदार होते.
 पूर्वी गोकाकचा देसाई शिवलिंगाप्पा म्हणून होता. त्यानें बंडावा केल्यामुळे सावनूरचा नबाव अबदुल मजीदखान यानें त्यावर स्वारी केली व त्याचें रहाण्याचे ठिकाण कुरबेट म्हणून होतें तें घेतलें. तेव्हां तो देसाई पळून चिकोडीकर देसायाच्या आश्रयास जाऊन राहिला. नवाबानें त्याचें देसगतीचें वतन त्याचाच भाऊ अमीन आप्पा म्हणून होता त्यास दिलें. इकडे चिकोडीकरानें शिवलिंगाप्पास दगा करून मारून टाकिलें व त्याचें मुलगे लखमगौडा व शिवरामगौंडा म्हणून होते त्यांस कैदेंत ठेविलें. प्रस्तुतच्या प्रसंगी या दोघां मुलांनी आपली मुक्तता करण्याविषयीं नारायणरावतात्यांस प्रार्थना केली. त्यावरून पेशव्यांची स्वारी कबूर प्रांत हुकेरी येथें उतरली असतां त्याजकडून चिकोडीकरांस ताकीद देववून नारायणरावतात्यांनी ते गोकाकच्या देसायाचे दोघे मुलगे आपणाजवळ आणवून ठेवून घेतले. पुढें लष्कर कूच करून खंडण्या घेत घेत श्रीरंगपट्टणपर्यंत गेलें. मार्च महिन्यांत स्वारी परत फिरली. वाटेंत होळेहोन्नूरचा किल्ला लागला तो हल्ला करून काबीज करण्यांत आला. एप्रिलांत तुंगभद्रेअलीकडे लष्कर आलें तेव्हां धारवाड काबीज करण्याचा मनसबा ठरला. तेथें मोंगलाचा किल्लेदार पृथ्वीसिंग म्हणून होता. याजकडे राजकारण करून शिबंदी खर्चाबद्दल त्यास ३५००० रुपये देऊन तारीख १३ मे रोजी