Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७१ )
नारायणराव व्यंकटेश.

ताराबाईंची भाऊसाहेबांस फूस होती त्याबद्दल पेशव्यांस भय वाटत नव्हतें, पण संभाजीमहाराजानीं भाऊसाहेबांस पेशवाईचीं वस्त्रें देऊं केल्याचें ऐकतांच ते गडबडून गेले ! कोल्हापूरच्या राज्याची साताऱ्याच्या राज्यापासून जर फारकत झालेली असती तर पेशव्यांस डगमगण्याचें काहींच कारण नव्हतें. भाऊसाहेबांनीं करवीरराज्याची पेशवाई कबूल केली तर करीनात, बरें झालें, भाऊची ब्याद कृष्णावारणेच्यापलीकडे गेली म्हणजे आयताच घरांतला तंटा मिटला, याबद्दल पेशव्यांस संतोषच झाला असता ! पण वस्तुस्थिति तशी नव्हती. रामराजांप्रमाणेंच संभाजीमहाराज हेही मराठी साम्राज्याच्या छत्रपतिपदास अधिकारी होते. त्यांच्या मनगटाचा जोर चालला नाहीं ही गोष्ट निराळी, परंतु त्यांचा हक्क कोणास नाकबूल करितां येणें शक्य नव्हते. तूर्तच्या प्रसंगीं ते कांही अन्याय करीत होतें असेंही नाही. नानासाहेब व भाऊसाहेब हे बाळाजी विश्वनाथ यांचे नातू असल्यामुळें दोघेही त्यांस सारखेच होते. कोणी तलवारबहाद्दर किती पराक्रमी असला तरी तलवारीच्या टोकास एखादें सनदेचें चिटोरें अडकविल्याशिवाय ती त्याची तलवार यशस्वी होत नाही. भाऊसाहेबांच्या तलवारीस अडकविण्याकरिता संभाजीमहाराजांकडून चिटोरे मिळण्याचा संभव दिसताच त्या तलवारीचें नानासाहेबांस भय वाटूं लागलें ! त्यांनीं तत्काळ भाऊसाहेबांची समजूत करून त्यांचा कारभार त्यांच्या हवाली केला आणि संभाजीमहाराज व जिजाबाई यांस सांगून पाठविलें की, " इकडच्या राजमंडळांत आम्ही पेशवे आहों ते तुमचेही आहोंच. सर्व राज्याची पेशवाई एकट्या आम्हांसच द्यावी. आम्ही भाऊसाहेबांची समजूत काढली आहे. त्यांचा आमचा तंटा नाहीं. आपल्या आज्ञेबाहेर आम्ही वागणार नाही. " त्यांनी ताराबाईंसही कांहीं देऊं घेऊं केलें व सर्वाशीं सामोपचारानें वागून या वेळीं तरी पेशवाईचा विभाग होऊं देंण्याचें टाळिलें.