पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७० )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

 तुमच्या आज्ञेप्रमाणें आपण वागूं असें पेशव्यानीं ताराबाईजवळ कबूल केलें तेव्हांच शाहू महाराजांनीं पेशव्यांस दिलेली राज्याच्या वडीलकीची सनद बाईंनीं मान्य केली. कबूल केल्याप्रमाणें पेशवे वागतात कीं नाहींत, हें पहाण्यासाठीं त्यानीं त्यांस आज्ञा केली कीं, दादोबा प्रतिनिधि यास तुम्हीं कैदेंत ठेविलें आहे त्याची मुक्तता करून जहागीर त्याची त्यास परत द्यावी. पेशव्यांनीं त्याप्रमाणें करितांच ताराबाईंनीं दादोबाकडून हळू हळू फौजबंदी करवून त्यास मोहिमेंवर पाठवावें व त्याच्या द्वारें आपला पक्ष प्रबळ करावा असें योजिलें. ती मसलत पेशव्यांस कळत नव्हती असें नाही, परंतु त्यांस उघडपणें अडथळा करितां येईना. ताराबाईंच्या आज्ञेप्रमाणें फौज चाकरीस ठेवून दादोबा सन १७५२ त सावनूरच्या मोहिमेस गेले. त्यांस जोडीदार म्हणून पेशव्यांनी नारायणराव तात्यांस फौजेसह प्रतिनिधीबरोबर रवाना केलें. ही मोहीम बुडवावी असा पेशव्यांचा मनोदय होता व त्याप्रमाणें नारायणराव तात्यांस त्यांचा आंतून इशाराही होता. सावनुराजवळ गेल्यावर तात्यांनी कांहींच मेहनत न केल्यामुळें प्रतिनिधि पराजित होऊन पळून आले आणि त्याबरोबर तात्याही पळून आले ! ताराबाईस म्हातारचळ लागला असें समजून पेशव्यांनीं त्यांशीं हा लपंडाव केला !

 बाजीराव पेशव्यांस महाराजांनीं पेशवाई दिली त्या वेळीं चिमाजी आपांस पेशव्यांचे कारभारी नेमिलें होतें, त्याचप्रमाणें नानासाहेबांस पेशवाई दिली तेव्हां भाऊसाहेबांस त्यांचे कारभारी नेमिलें होतें. परंतु कारभाऱ्याचे अधिकार व काम पेशव्यांनी भाऊसाहेबांकडे अद्यापि जसें सोपवावें तसें सोंपविलें नव्हतें. शाहूमहाराज वारल्यानंतर या दोघां चुलत भावांत या प्रकरणी तंटा होऊन दरबारांत दुफळी झाली. कांहीं मुत्सद्दी नानासाहेबांस मिळाले, तर कांहीं भाऊसाहेबांस मिळाले !