Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(६१)
नारायणराव व्यंकटेश.

माणसांनीं रामराजे तान्हें मूल होतें तेव्हांपासून त्यांस पोसून वाढविलें. यांच्या शत्रूंस ते कोठें तरी जिवंत आहेत हें कळल्यामुळे तळमळ लागली होती, पण ते कोठें आहेत हें ठाऊक नसल्यामुळें त्यांचा उपाय चालला नाही. एकदां ते बावडयास आहेत असा सुगावा लागल्यावरून संभाजीमहाराजांच्या पत्नी जिजाबाई बावड्यावर चालून गेल्या, पण त्या वेळीं रामराजांस घांटाखालीं पळवून लपवून ठेवण्यांत आल्यामुळें त्यांचा जीव बचावला! ताराबाई साताऱ्याहून केव्हां तरी,गुप्तरूपें विश्वासू माणूस पाठवून त्यांचा समाचार घेत. ते कोठें कोणच्या स्थितींत आहेत हें ताराबाईंनीच शाहूमहाराजांस कळवून त्यांचे त्यांजकडे लक्ष वेधिलें होतें. याप्रमाणें चाललें असतां रामराजांस एक नवीनच शत्रु निर्माण झाला, तो इतर शत्रूंपेक्षांही भयंकर होता! तो शत्रू म्हणजे सकवारबाई होत. त्यांस रामराजे बावड्यास असल्याची बातमी लागल्याचें वर्तमान शाहूमहाराजांस कळलें. थोरल्या धनिणीचा स्वभाव त्यांस माहीत होता. त्यांनी ती गोष्ट ताराबाईंच्या कानावर घालून त्यांस सावध केलें. ताराबाईंनी गोविंद खंडेराव चिटणीस यांस बावडयास पाठवून रामराजांस तेथून काढून मोगलाईंत पानगांवास त्यांची मावशी होती तिजकडे पोंचतें केलें. तिला त्यांस उघडपणें आपणाजवळ ठेवून घेण्याचा धीर होईना, म्हणून तिनें त्यांस तुळजापुरास एका भुत्याच्या हवाली केलें! तेथें हे भावि छत्रपति रामराजे भीत भीत चार साडेचार वर्षें लपून होते. या सर्व गोष्टी स. १७४९ पूर्वी झालेल्या आहेत.
  इंग्रजानीं मराठ्यांचें राज्य घेतलें तेव्हां ते एकप्रभुसत्ताक राज्य नसून प्रधानाधिष्ठित-संयुक्तसंस्थानिक-मंडळाचें राज्य होतें. त्यावेळीं हें मर्यादित सत्तेचें संस्थानिकमंडळ नसतें, आणि सर्व राज्यावर अनियंत्रित अधिकार चालविणारा एकच राजा असता, तर इंग्रजांचा