Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(५७)
नारायणराव व्यंकटेश.

 आजरें महालाची वहिवाट नारो महादेव यांजकडे होती व पुढें सन १७२४ त शाहूमहाराजानीं त्यांतला निम्मा महाल व्यंकटरावांस मोकासा नेमून दिला हें मागें सांगितलेंच आहे. बाकी निम्या महालाचीं म्हणजे एकतर्फी खेडीं व्यंकटराव वहिवाटीत होते तीं कापशीकरांतर्फे वहिवाटीत असल्यामुळें त्यांवर त्यांची अर्थातच मालकी नव्हती. व्यंकटराव वारल्यावर त्यानीं व त्यांच्या वडिलानीं राज्याची कशी सेवा केली हें लक्षात घेऊन व अनुबाई ही बाळाजी विश्वनाथ यांची कन्या इकडेही लक्ष देऊन शाहूमहाराजानीं आतां तो सबंध आजरें महाल अनूबाईस इनाम करून दिला. मोकासा हा सरंजाम असतो अगर इनामही असतें, परंतु तें सरकारानें काढून घेण्यास पात्र असल्यामुळें त्यास स्थायिकपणा कमी असतो. इनामाची गोष्ट तशी नाहीं. तें इनामदाराने पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें उपभोगावें म्हणून दिलेलें असतें, ही गोष्ट लक्षांत घेतली असतां शाहूमहाराजानीं अनूबाईंवर व तिच्या वंशजांवर केवढा उपकार केला हें ध्यानांत येईल.
 कृष्णावारणेचा तह झाला त्यांत त्या दोन नद्या व तुंगभद्रा यांमधला मुलूख करवीरकरांचें राज्य असें यद्यपि ठरलें होतें, तथापि तो मुलूख व त्यापैकीं विशेषेंकरून कर्नाटकाचा भाग करवीरकरांच्या ताब्यांत कधींच आला नाही हें पूर्वी दर्शविलेंच आहे. सावनूरच्या नबाबाने तो मुलूख व्यापीत व्यापीत तेरदाळ, गोकाक, चिकोडी, हुकेरीपर्यंत अंमल बसवीत आणिला. तेव्हां सर्वच मराठी राज्यास अपाय होण्याचा प्रसंग येऊन ठेपला. त्यामुळें ज्या अर्थी त्या नबाबाचें पारिपत्य संभाजीमहाराजांकडून होत नाहीं, त्या अर्थी तें आपणास करणें प्राप्त आहे असें शाहूमहाराजांच्या मनांत आलें. पण त्या कामावर त्यानीं बाबूजी नाईक बारामतीकर यांची योजना केली तिचा कांहींच उपयोग झाला नाही. सावनूर, कडपें, कर्नूळ येथील नबाब