Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(५६)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.


नाच्या वैभवाचा कळस झाला म्हटलें तरी चालेल, त्या संस्थानाचें वैभव इतकें वृद्धिंगत होण्यास नारायणरावतात्यांची करामत कारण होती अशांतला प्रकार मुळींच नाहीं. त्याचें मुख्य कारण त्यांच्या मातोश्री अनूबाई यांचेंच कर्तृत्व होय. मुलगा प्रौढ दशेंत येऊन संस्थानचा कारभार व सरदारीचा बोजा संभाळण्याजोगा होण्यापूर्वीच व्यंकटराव वारले; त्यामुळें ती दोन्हीं कामें नीट चालतील अशा तजविजी योजणें अनूबाईचें कर्तव्य होतें, व तें बजावण्यासारखी बुद्धि व साधनें त्यांस अनुकूळ होतीं.
  नानासाहेब पेशवे व त्यांचे बंधु हे अनूबाईचे भाचे असल्यामुळें त्यानीं नारायणरावतात्यांचा पुरस्कार करण्याचें मनावर घेतलें, व त्यांच्या वडिलांकडे सरदारी होती तीच त्यांजकडे कायम करून प्रत्येक स्वारींत त्यांजकडे काहींना कांही तरी कामगिरी सोंपविली इतकेंच नाही, तर इनामें तैनाता देऊन मोठमोठ्या मामलती सांगून व मुलुखगिरींत संस्थानिकांकडे खंडणी करार करण्याच्या बोल्या त्यांजवरच सोंपवून त्यांस लाखों रुपये मिळवून दिलें. व्यंकटरावांप्रमाणें नारायणरावतात्यानीं एखादी नांवलौकिकाची मोहीम स्वतंत्रपणें पतकरून ती तडीस नेली असें नाहीं. नारायणरावतात्यानीं अमुक अमुक स्वाऱ्या केल्या असें म्हणण्यापेक्षां पेशव्यांच्या अमुक अमुक स्वाऱ्यांत ते हजर होते असेंच म्हणणें वाजवी आहे. कसेंही असलें तरी ज्या- अर्थी आम्ही त्यांचें चरित्र वर्णन करणार, त्या अर्थी ते व त्यांचे सरदार कोणकोणत्या मोहिमांत हजर होते व त्यानीं काय काय कामें केलीं हें सांगणें आम्हांस प्राप्त आहे व तें सांगतांना त्या मोहिमा कशामुळें उद्भवल्या, कोणावर झाल्या, त्यांत युद्धादिकांचे प्रसंग कोठें झाले हें सांगणें ओघानेंच येतें.