यांचें एक कूट असून त्यांस निजामाचें पाठबळ असल्यामुळें ते वेळ पडेल तशी परस्परांस कुमक करून शाहूमहाराजांचीं राजकारणें हाणून पाडूं लागले. मग कर्नाटकाचा कारभार महाराजानीं बारामतीकर यांजकडून काढून पेशव्यांवर सोंपविला. तेव्हां पेशव्यानीं कोणाशीं युक्तीनें, कोणाशी ममतेनें, तर कोणाशीं जबरदस्तीने वागून त्यांवर आपला पगडा बसविला, व आपला कार्यभाग सिद्धीस नेला. नानासाहेब पेशवे हयात होते तोपर्यंत दर वर्षी कर्नाटकांत स्वारीस जात व त्यांबरोबर बहुतेक स्वाऱ्यांतून नारायणरावतात्या हजर असत. या स्वाऱ्यांचें वर्णन क्रमाक्रमाने पुढें येईलच. तूर्त आधीं साताराप्रांती त्यांस फौजेसह चाकरी करण्याचे प्रसंग पडले त्यांचें वर्णन करूं.
हे प्रसंग मराठी साम्राज्याची मुख्य सत्ता छत्रपतींच्या घराण्यांतून निघून पेशव्यांच्या घराण्यांत कशी गेली यासंबंधाचे आहेत, व त्याचा नुसता निर्देश करीत गेलें तरी आमचें काम भागण्यासारखें आहे. तथापि अतिविस्ताराचा-किंबहुना विषयांतराचासुद्धां-दोष पतकरून आम्ही या प्रसंगांची अंमळ अधिक विस्तारपूर्वक चर्चा करीत आहों. यांचा संबंध इचलकरंजी संस्थानाच्या इतिहासाशीं अगदींच नाहीं असें मात्र नाहीं. शाहूमहाराज मरण्यापूर्वी व त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्या साताऱ्यास अनूबाई व नारायणरावतात्या पेशव्यांच्या स्वारींत समक्ष हजर असता त्यांच्या डोळ्यांदेखत घडलेल्या आहेत, पेशव्यांच्या मसलतीस बाईंचा सल्ला व तात्यांची शिपाईगिरी थोड्या तरी अंशानें सहायभूत झालेलीं आहेत, आणि करवीरकर राणी जिजाबाई व दुर्गाबाई यांचें अनूबाईशीं पुढें वैर उत्पन्न होऊन इचलकरंजी संस्थानाचें फार नुकसान झालें त्याला हे साताऱ्यास घडलेले कांहीं अंशीं कारण आहेत. या गोष्टी जरी निर्विवाद आहेत तरी तेवढ्याकरितांच आम्ही या गोष्टींची चर्चा करीत आहों असें नाहीं.
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/६८
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(५८)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.